अलाहाबाद येथील एका ४० वर्षीय महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले आणि कानपूर रेल्वे स्थानकानजीक तिला फेकून देण्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर महिला शुक्रवारी दुपारी रेल्वे मार्गाजवळ आढळली. तिचा एक डोळा निकामी झाल्याचे, त्याचप्रमाणे चेहरा आणि मान भाजल्याचे स्पष्ट दिसत होते. तिची ओळख पटू नये यासाठी तिघांनी तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चेहरा भाजला असल्याने तिला बोलता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तिघांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे या महिलेने पोलिसांनी खाणाखुणा करून सांगितले.ही महिला नीट बोलू लागल्यानंतर पुढील तपास हाती घेण्यात येणार आहे. ही महिला भिकारी होती आणि दोन दिवसांपूर्वीच कानपूरला आली होती, असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. तर कामाच्या शोधात ही महिला कानपूरला आली होती आणि नजीकच्या झोपडपट्टीत ती राहात होती, असे काही जणांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.