भाजपच्या जाहीरनाम्यानुसार योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशात पावले

गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होताच राज्यातील कत्तलखान्यांवर संक्रांत ओढवली आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार, राज्यभरातील कत्तलखाने बंद करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. यानंतर लखनौ महापालिकेने तातडीने कारवाई करत राज्याच्या राजधानीत मांसविक्री करणाऱ्या नऊ दुकानांना टाळे ठोकले.

गायींच्या तस्करीवर संपूर्ण बंदीची अंमलबजावणी निश्चित करण्याचेही निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि याबाबतीत कुठलेही उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असे सांगितल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मात्र, कुठल्या प्रकारचे कत्तलखाने बंद केले जातील याबाबतचा तपशील त्यांनी दिला नाही.

राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात येतील आणि सर्व यांत्रिक कत्तलखान्यांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल असे भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले होते.

राज्यभरातील पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये त्यांच्यावर छापे घातले आहेत. लखनौ महापालिकेने बुधवारी महानगर व अलीगंजमधील मांसविक्रीच्या ९ दुकानांना सील ठोकले.

लखनौलगतच्या ११ जिल्ह्य़ांमध्ये गुरे व मांस यांची अवैध वाहतूक, कत्तलखाने आणि गोहत्या यांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आल्याचे लखनौ परिक्षेत्राचे महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी मंगळवारी सांगितले होते. यात लखनौशिवाय उन्नाव, बाराबंकी, रायबरेली, सीतापूर, हरदोई, लखीमपूर खिरी, अमेठी, सुलतानपूर, फैझाबाद व आंबेडकर नगर जिल्ह्य़ांचा समावेश आहे. पोलीस महानिरीक्षक जावीद अहमद यांनीही यापूर्वीच जिल्हा पोलीस प्रमुखांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या संदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत.

गायींच्या तस्करीमुळे दुधावर आधारित उद्योगांची वाढ होत नसल्याचे भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले होते. तर, ज्या क्षणी आपला पक्ष राज्यात सत्तेवर येईल, त्या क्षणी सर्व कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात येईल असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचारसभांमध्ये सांगितले होते.

सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत पान चघळणे थांबवावे

सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यालयात असताना पान, पान मसाला चघळणे थांबवावे असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. सचिवालय व बाजूच्या इमारतीला भेट दिली असता त्यांना भिंतीवर पान खाऊन थुंकल्याचे डाग दिसून आल्यावर हे आदेश जारी करण्यात आले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे मुख्यमंत्र्यांसमवेत होते त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी सचिवालय व लगतच्या इमारतीतील सर्व मजल्यांना भेट दिली. तेथे त्यांना पान खाऊन थुंकल्याचे डाग दिसले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळात पान किंवा पान मसाला खाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. इमारतीतील वातावरण स्वच्छ ठेवावे, प्लास्टिकचा वापर टाळावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. लाल बहादूर शास्त्री भवन येथे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय व सचिवालय आहे. मुख्य सचिव, प्रमुख सचिव (गृह) व इतर आयएएस अधिकाऱ्यांची कार्यालये तेथेच आहेत.

सडकसख्याहरीविरोधी पथके उत्तर प्रदेशात तैनात

भाजपने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गोरखपूरपासून मीरतपर्यंत सगळीकडे सडकसख्याहरीविरोधी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानंतर छेडछाड करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिस पथके गस्त घालू लागली आहेत. महिलांची विशेष करून तरुणींची सुरक्षा हा त्यामागचा हेतू आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल्स या पथकात आहेत पिलीभीत येथे एका पथकाने पाच जणांना पकडले.

काही ठिकाणी पकडलेल्या युवकांना मोक्याच्या चौकात उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली व पुन्हा छेडछाड करणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांना देण्यात आली. महिलांना त्रास होऊ नये हा यामागचा हेतू असल्याचे बाराबंकीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले.

लखनौ, बुलंदशहर, मीरत, मिर्झापूर, रायबरेली येथे या पथकांची गस्त सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्यांवरही करडी नजर ही पथके ठेवणार आहेत कारण यातूनच पुढे छेडछाडीच्या घटनाही घडतात. आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून ९३४ जणांचे जबाब घेण्यात आले. लखनौत सडकसख्याहरी विरोधात २३ पथके स्थापन केली आहेत.