‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’  या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या २०१४ च्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेतून प्रवेशपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई आणि आंध्र प्रदेश राज्य शिक्षण मंडळाच्या खालोखाल सर्वाधिक विद्यार्थी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चे आहेत. गेल्या वर्षी या स्थानावर राजस्थान शिक्षण मंडळ होते. परंतु, राज्य शिक्षण मंडळाची कामगिरी यंदा चांगलीच सुधारल्याने महाराष्ट्राने गेल्या वर्षीच्या चौथ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेत राजस्थानला मागे टाकले आहे.
आयआयटी अ‍ॅडव्हान्स-जेईई या दुसऱ्या टप्प्यावरील प्रवेश परीक्षेतून काही मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता पात्र ठरविते. यंदाही आयआयटी प्रवेशाकरिता पात्र ठरविण्यात आलेल्या २७,१५२ विद्यार्थ्यांपैकी सीबीएसईचे १४,९५५ विद्यार्थी आहेत. त्यानंतर ‘आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन’चे ४,७४५ विद्यार्थी आयआयटी प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत. तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या १,८१९ विद्यार्थ्यांना देशभरातील आयआयटीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले. राजस्थानचे १,५५१ विद्यार्थी आयआयटी प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी राजस्थानमधून १,३७६ तर महाराष्ट्रातून १,२१० विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राने आपली कामगिरी सुधारत तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळविले आहे.कोटा ही सामाईक प्रवेश परीक्षांच्या खासगी क्लासेसची पंढरी म्हणून ओळखली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांत आंध्रमध्येही क्लासेसचे जाळे वाढू लागले आहे. आंध्रमध्ये राजस्थानच्या धर्तीवर कनिष्ठ महाविद्यालये आणि क्लासेस यांच्यात ‘टायअप’ प्रकार वाढल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा आयआयटीतील टक्का वाढला आहे. पर्यायाने येथील आंध्र राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रालाही आता या संस्कृतीची लागण झाली आहे.शिवाय आयआयटीकरिता घेण्यात येणाऱ्या जेईई प्रवेश परीक्षेसाठी सीबीएसईचा दहावी-बारावीचा अभ्यासक्रम प्रमाण मानला जातो. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीबरोबरच आपल्या इतरही खालच्या इयत्तांकरिता सीबीएसईप्रमाणेच ‘एनसीईआरटी’ने ठरवून दिलेला अभ्यासक्रम प्रमाण मानत त्यानुसार बदल केले आहेत. त्याचा बऱ्यापैकी फायदा राज्यातील विद्यार्थ्यांच्या जेईईतील कामगिरी सुधारण्याकरिता झाला आहे.
पुस्तकांची मांडणी पूरक
राज्य शिक्षण मंडळाचा दहावी-बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तके यांच्या मांडणीत केला गेलेला बदल  विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा आणण्यास कारणीभूत ठरला असावा. मंडळाचा दहावी-बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांकरिता (नीट, जेईई इत्यादी) ग्राह्य़ धरल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमानुसार १०० टक्के बदलण्यात आला आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. मंडळाने आता नववी-दहावीचा अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तकेही बदलली आहेत. त्याचे आणखी चांगले परिणाम भविष्यात विद्यार्थ्यांच्या केंद्रीय प्रवेश परीक्षांमधील कामगिरीत पाहायला मिळतील.
– उज्ज्वला पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

ठरावीक शहरांची आघाडी
आयआयटीत प्रवेश मिळविणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अजूनही कमीच आहे. जेईई-मुख्य परीक्षेतून प्रवेशपात्र ठरलेल्या २७,१५२ विद्यार्थ्यांपैकी मुली अवघ्या ३००९ आहेत. यापैकी सर्वाधिक ८७२ मुली चेन्नई विभागातून आहेत. तसेच, एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४,९४६ विद्यार्थी जयपूर, दिल्ली, पटणा, विजयवाडा, हैदराबाद, विशाखापट्टणम, मुंबई, पुणे, सिकर, भोपाळ, लखनऊ, कानपूर आणि चेन्नई या शहरांमधील आहेत हेही लक्षणीय आहे.