सभासद अपात्रता, ३३१ कोटींचे कर्ज

परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यातील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस संचालकांना त्यांच्या कार्याचे भोग भोगावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या  कारखान्याचे वाढीव ६४६५ सभासद अपात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे भोगावती साखर कारखान्यावर ३३१ कोटींचे कर्ज असूनही, ते चुकीचा ताळेबंद निर्माण करून वाढलेला तोटा कमी दाखवण्याचा प्रकार चव्हाटय़ावर आला आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भोगावती सहकारी साखर कारखान्यातील हे गरप्रकार सत्ताधाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत.

करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचा कारभार नेहमीच चच्रेत असतो.  सत्तारूढ संचालकांनी सत्ता टिकवण्यासाठी सभासद बेसुमार वाढवले. त्याला अर्थातच आव्हान देण्यात आले. त्यामुळे कारखान्याचे वाढीव ६४६५ सभासद अपात्र ठरले आहेत. अपात्रतेची ही कारवाई प्रादेशिक सहसंचालक सचिन रावळ यांनी केली आहे. तर या कारवाईने कारखान्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. तर विरोधी गटातील काँग्रेसला मोठी ताकत मिळाली असल्याचे मानले जाते. या निर्णयामुळे आता भोगावतीच्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

बेकायदेशीर सभासद अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज भोगावतीचे सभासद सदाशिव चरापले व लहू पाटील व इतरांनी दिला होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले होते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २०१४ रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आलेल्या नवीन सभासदांची पात्रता तपासून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. एकूण ७१३२ सभासदांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तब्बल २३ वेळा सुनावणी घेण्यात आली. निकष पूर्ण केलेले नाहीत, अशा ६४६५ शेतकरी सभासदांची नावे सभासद नोंदवहीतून कमी करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत.

‘भोगावती’वर कर्जाचा डोंगर

भोगावती सहकारी साखर कारखान्यावर ३३१ कोटींचे कर्ज असून, चुकीच्या ताळेबंदाने तोटा कमी दाखविण्यात आला आहे. ढिसाळ नियोजनाने सभासदांना १२ महिन्यांची साखर मिळालेली नाही, असा आरोप काँग्रेसचे माजी संचालक विश्वनाथ पाटील यांनी केला. ते मागील संचालक मंडळातील एकमेव विरोधी संचालक असून, त्यांच्या आरोपाने ‘भोगावती’वर नेमके कर्ज किती यावरून खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भोगावती’ची आíथक स्थिती वाईट झाल्याने ताळेबंदात संचित तोटा दिसू लागल्याने कोणतीही बँक सहवीज निर्मिती प्रकल्पाला आíथक पुरवठा करणार नाही, म्हणूनच संचित तोटा कमी दाखवून कर्ज कमी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४-१५ च्या हंगामात ६४ कोटींचा तोटा झाला आहे; तर या गळीत हंगामात १४ कोटी ३० लाखांचा तोटा होणार आहे.‘भोगावती’वर ३३१ कोटींचा कर्जाचा डोंगर असून, साखरेवरील कर्ज सोडून ८९ कोटी २६ लाखांचे कर्ज, ठेवी १४ कोटी ७९ लाख रुपये, इतर देणी १९ कोटी ७५ लाख रुपये असून, साखर तारण कर्ज १३६ कोटींचे आहे. कारखान्याकडे १६४ कोटींची साखर शिल्लक आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पाला कर्ज मिळविण्यासाठी ८२ कोटींचा तोटा मुरविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.