विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र एक वेळ अशीही होती की जेव्हा भारतीय संघाची कामगिरी खालावली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज मुंबईतल्या एका कार्यक्रमात या खडतर काळाच्या आठवणी जागवल्या. २००७ च्या विश्वचषकाचा काळ भारतीय संघासाठी आतापर्यंत सर्वात खडतर काळ होता, असं सचिनने मत वक्तव्य केलं आहे.

अवश्य वाचा – सहा वर्षाच्या चिमुरडीची मागणी वाचून सचिनही हसला

“२००७ सारखी वाईट परिस्थिती आतापर्यंत कधीच निर्माण झाली नव्हती. विश्वचषकात आम्ही साखळी फेरीतून बाद झालो. यानंतर भारतीय संघासाठी सर्व गोष्टी बदलल्या. भारतात परत आल्यानंतर आम्ही या पराभवाची मरगळ झटकून नव्याने विचार करायला सुरुवात केली. यानंतर संघात अनेक बदल करण्यात आले. चांगले निकाल मिळावेत याकरता आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली, ज्याचा नंतरच्या काळात आम्हाला चांगलाच फायदा झाला”. बांगलादेशकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबद्दल सचिनने उपस्थितांशी संवाद साधला.

अवश्य वाचा – मास्टर ब्लास्टरने लेफ्टनंट स्वाती महाडिकांना असा केला सलाम

कोणत्याही संघात बदल हे एका रात्रीत घडून येत नसतात. त्यासाठी वाट बघावी लागते. २००७ नंतर आम्हाला लगेच यश मिळालं नाही, प्रशिक्षकांनी तयार करुन दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहिलो आणि याचमुळे २०११ साली भारत घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकू शकला. क्रिकेटमध्ये करियरला सुरुवात केल्यानंतर विश्वचषक जिंकण्यासाठी मला तब्बल २१ वर्ष वाट पहावी लागली, असं म्हणत सचिनने आपल्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या टप्प्यातल्या आठवणींना उजाळा दिला.