अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार हाताशी असणे हे टीम इंडियाचे भाग्यच असल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी केले. रहाणे त्याच्या स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्त्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्त्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे. अशा दोन्ही वृत्तीचे कर्णधार एकाच वेळी संघात उपलब्ध असणे संघासाठी नेहमी चांगलेच असते, त्यामुळे टीम इंडिया खरंच नशिबवान आहे, असे इयान चॅपेल ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

धरमशाला कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. भारताने धरमशाला कसोटी ८ विकेट्सने जिंकून मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. कसोटीत रहाणेने संयमाने संघाचे नेतृत्त्व केलेच, पण दुसऱया डावात तितकीच आक्रमक फलंदाजी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब देखील केले.

इयान चॅपेल म्हणाले की, ”रहाणेने धरमशाला कसोटीत संघाचा कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. संघाच्या खऱया कर्णधाराची नेतृत्त्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशावेळी त्याची जागा भरून काढणे खूप मोठे आव्हान तुमच्यासमोर असते. अशावेळी आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्त्व करावे की आपली पद्धत आपण कायम ठेवावी हा प्रश्न असतो. पण रहाणेने अतिशय योग्य गोष्ट केली. त्याने आपल्या स्वत:च्या पद्धतीने संघाचे नेतृत्त्व केले.”

 

रहाणेने धरमशाला कसोटीत दुसऱया डावात भारताचे दोन शिलेदार स्वस्तात तंबूत दाखल झाले असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता पहिल्याच चेंडूपासून आक्रमक सुरूवात केली होती. रहाणेने २७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या होत्या. यात २ खणखणीत षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.

रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्रमकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करत आहात यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोबल यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे नेतृत्त्व गुण भिन्न आहेत. दोघंही उत्कृष्ट आहेत. पण धरमशालात रहाणेने ज्यापद्धतीने नेतृत्त्व केले ते वाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.