काही दिवसांपूर्वी दिलीप वेंगसरकर, हरभजन सिंग तसेच अन्य माजी क्रिकेटपटूंनी पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस) स्वीकारा, अन्यथा त्याचे परिणाम भोगा, असा इशारा दिल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ‘‘सद्यस्थितीतील डीआरएस पद्धत स्वीकारता येणार नाही,’’ असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
‘‘पंच पुनर्आढावा प्रक्रियेत दोष असल्यामुळे ती स्वीकारणे योग्य नाही, हे आमचे आधीपासूनचे म्हणणे आहे. ‘बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान’ आणि डीआरएसविषयी दाद मागण्याची पद्धत याला आमचा विरोध आहे. जर डीआरएस पद्धतीद्वारेच निर्णय द्यायचे असतील तर टीव्हीसमोरील बसलेल्या तिसऱ्या पंचाचे काम काय,’’ असा सवाल बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी केला आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने डीआरएसमध्ये बदल केल्यानंतर बीसीसीआयला ही पद्धत स्वीकारण्यास सांगितल्यावर आम्ही ती स्वीकारण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. डीआरएसमध्ये कोणतेही दोष नसल्यास, आम्ही ती स्वीकारू,’’  असे पटेल यांनी सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पंचांनी दिलेल्या खराब निर्णयांमुळे डीआरएसचा वापर करण्याविषयी सध्या बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी हरभजन सिंगने डीआरएसला पाठिंबा दिला होता.
‘‘आता डीआरएस स्वीकारण्याची योग्य वेळ आली आहे. त्याचा फायदा भारतालाच होणार आहे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने चांगला खेळ केला, पण काही ठिकाणी पंचांनी दिलेल्या खराब निर्णयांचा फटका भारतीय संघाच्या निकालावर बसला आहे,’’ असे हरभजन सिंगने सांगितले होते. माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, इरापल्ली प्रसन्ना आणि चेतन चौहान यांनीही डीआरएसला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, पटेल म्हणाले, ‘‘आयपीएलच्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयपीएल गव्हर्निग कौन्सिलने घेतला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे, त्या वेळी खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड ७ ते १० जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे.’’
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १४ फेब्रुवारी ते २९ मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताच्या १५ जणांच्या अंतिम संघाची निवड करण्यात येईल.