कॅनडाच्या कॅली मॅसीने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये विश्वविक्रम नोंदवत जागतिक जलतरण स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.

२१ वर्षीय कॅलीने १०० मीटर अंतर ५८.१० सेकंदांत पार केले आणि २००९मध्ये जेमा स्पॉफोर्थने नोंदवलेला ५८.१२ सेकंद हा विक्रम मोडला. अमेरिकेच्या कॅथलीन बेकरने रौप्यपदक मिळवले, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिला सीबोह्मला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. एमिलाने २०१५मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

‘‘विश्वविक्रम नोंदवण्याची खात्री नव्हती, मात्र सुवर्णपदकाची खात्री होती. माझ्यापुढे एमिलाचे आव्हान होते. मी पहिल्यापासून आघाडी घेण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे अंतिम २० मीटर अंतरात वेग वाढवत मी सर्वोत्तम वेळ नोंदवू शकले. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये मला सोनेरी कामगिरी करायची आहे. त्या दृष्टीने आतापासूनच मी सरावावर लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे मॅसीने सांगितले.

पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये इंग्लंडच्या अ‍ॅडम पिटीने उपांत्य फेरीत २५.९५ सेकंद वेळ नोंदवत स्वत:चा दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला २६.१० सेकंद हा विश्वविक्रम मोडला.

अ‍ॅडम शर्यतीनंतर म्हणाला, ‘‘यापेक्षा आणखी चांगली वेळ नोंदवण्याचे माझे ध्येय आहे. माझ्यापुढे माजी विजेता कॅमेरॉन व्हॅनडर बुर्घ व गतवेळचा कांस्यपदक विजेता केविन कोर्डीस यांचे आव्हान असले तरी मी भरपूर गृहपाठ केला आहे. जेवढी शर्यत रंगतदार होईल, तेवढी माझी कामगिरी आणखी चांगली होईल.’’

अ‍ॅडमला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत ५६ सेकंद वेळ नोंदवण्याचे ध्येय साकार करता आले नाही. त्याने हे अंतर ५७.४७ सेकंदांत पूर्ण केले.

अमेरिकेच्या कॅथी लिडेकीने २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत विश्वविजेतेपद मिळवण्याच्या आशा कायम राखल्या. तिने अंतिम फेरीत स्थान मिळवताना हे अंतर एक मिनिट ५४. ६९ सेकंदांत पार केले. ऑस्ट्रेलियाच्या एमा मॅकऑनने तिच्यापाठोपाठ ही शर्यत पूर्ण केली. कॅथीने २०१३मध्ये या स्पर्धेत चार सुवर्णपदकांची लयलूट केली होती. त्यानंतर २०१५मध्ये तिने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. येथे तिने ४०० मीटर व १५०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतींबरोबरच चार बाय १०० मीटर फ्रीस्टाइल रिलेतही सोनेरी यश मिळवले आहे.  पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीच्या विजेतेपदासाठी चीनचा अव्वल दर्जाचा खेळाडू सुन यांग हा दावेदार मानला जात आहे. त्याने येथे याआधी २०० मीटर व ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत जिंकली आहे.