रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पॅनिश फुटबॉल महासंघाने पाच सामन्यांसाठी निलंबित केले आहे. स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पध्रेतील बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली. रिअल माद्रिदने ३-१ अशा फरकाने हा सामना जिंकून जेतेपदाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे, परंतु परतीच्या लढतीत त्यांना रोनाल्डोशिवाय खेळावे लागणार आहे.

या लढतीत लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी होतीच आणि त्यात चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने पंच रिकाडरे डी बगरेस बेंगोएत्जी यांच्या निर्णयाविरोधात अती आक्रमकता दाखवली आणि त्यांना धक्काही दिला. या बंदीबरोबरच रोनाल्डोला ४ हजार ५०० अमेरिकन डॉलरचा दंडही भरण्यास सांगितला आहे.

या निर्णयाविरोधात रोनाल्डो दहा दिवसांत दाद मागू शकतो. दाद मागूनही रोनाल्डोवरील बंदी कायम राहिल्यास त्याला बार्सिलोनाविरुद्धच्या परतीच्या सामन्यात खेळता येणार नाही. तसेच ला लिगा स्पध्रेतील पहिल्या चार सामन्यांना त्याला मुकावे लागेल. त्यामुळे डेपार्टिव्हो ला कोरुना, व्हॅलेंसिया, लेव्हांटे आणि रिअल सोसिएदाद क्लबविरुद्ध तो माद्रिदचे प्रतिनिधित्व करणार नाही.

रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत रोनाल्डोला दाखवण्यात आलेल्या दुसऱ्या पिवळ्या कार्डाविरोधात दाद मागण्याची तयारी माद्रिद क्लबने दर्शवली आहे. ‘‘रोनाल्डोला मैदानाबाहेर जाण्यास सांगण्याचा निर्णय अनागोंदी आहे. तो पेनल्टी क्षेत्रातही नव्हता आणि तरीही त्याला कार्ड दाखवले, हा कठोर निर्णय आहे,’’ अशी प्रतिक्रिया माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी दिली.

रोनाल्डोला दुसऱ्या सत्रात मैदानावर पाचारण करण्यात आले. त्याने पहिल्या दहा मिनिटांतच गोल करून माद्रिदला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर त्याने टी-शर्ट काढून आनंद व्यक्त केला आणि त्यावेळी त्याला पहिले पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्याच्या दोन मिनिटानंतर दुसरे पिवळे कार्ड दाखवून सामनाधिकाऱ्यांनी लाल कार्डसह त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

रिअल माद्रिदचा विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या दोन कट्टर प्रतिस्पध्र्यामधील लढत पाहणे म्हणजे दुग्धशर्करा योगच.. त्यामुळे ला लिगा, चॅम्पियन्स चषक किंवा मैत्रीपूर्ण लढतीच्या निमित्ताने उभय क्लब एकमेकांसमोर आले, की त्या लढतीला महत्प्राप्ती मिळतेच. स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पध्रेच्या निमित्ताने रविवारी मध्यरात्री हे क्लब समोरासमोर आले आणि नेहमीप्रमाणे चुरशीच्या खेळाचा आस्वाद उपस्थित फुटबॉलप्रेमींना मिळाला. पहिल्या लीगच्या या लढतीत रिअल माद्रिदने ३-१ असा विजय मिळवला. बार्सिलोनाच्या गेरार्ड पिक्यूच्या स्वयंगोलने ५०व्या मिनिटाला माद्रिदचे खाते उघडले. मात्र, लिओनेल मेस्सीने ७७व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकच्या जोरावर बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर रोनाल्डो आणि मार्को अ‍ॅसेन्सीओ यांनी अनुक्रमे ८० व ९०व्या मिनिटाला गोल केले.  या गोलने माद्रिदचा विजयाचा मार्ग सुकर झाला.