युद्ध हे फक्त सैनिक आणि दारूगोळ्यांच्या जोरावर जिंकता येत नाही, तर खंबीर मनोबल लागतं.. आणि हेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या आगामी लढतींमधील गमक असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघांचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे आणि इंग्लंडच्या गोटात निराशा आहे. त्यामुळे या सामन्या जो संघ अधिक सक्षम मनोबलाने उतरेल, त्यालाच विजयाची अधिक संधी असेल. क्रिकेटच्या पंढरीत विजयाचा टिळा लावत भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून ही आघाडी वृद्धिंगत करण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरेल. तर दुसरीकडे दुसऱ्या सामन्यात पराभव ओढवून घेणारा इंग्लंडचा संघ पराभवाची परतफेड करायला सज्ज असेल. दोन्ही संघांमध्ये चांगली गुणवत्ता असली तरी ते मैदानात कोणत्या ईर्षेने उतरतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताने लॉर्ड्सवर विजयाचा पताका फडकावला असला तरी संघामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. भारत या सामन्यांमध्ये सहा फलंदाजांनिशी उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळवलेल्या स्टुअर्ट बिन्नीला चांगली गोलंदाजी करता आलेली नाही. दोन सामन्यांमध्ये त्याला फक्त २० षटकेच देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माला संघात स्थान मिळू शकते. सलामीवीर मुरली विजय, अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्मात आहे. पण विराट कोहलीला अजूनही सूर गवसलेला नाही. चेतेश्वर पुजारा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून मोठय़ा खेळीची संघाला अपेक्षा असेल. भुवनेश्वर कुमार एक चांगला फलंदाज म्हणून या दौऱ्यात सर्वासमोर आला आहे. इशांत शर्मा, भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी यांनी आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली आहे.
इंग्लंडच्या संघ पुरता निराश झालेला दिसतो, त्यांच्यामधले चैतन्य हरवल्यासारखे वाटत आहे. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक चांगल्या फॉर्मात नाही. हुकमी एक्का असलेल्या इयान बेलच्या धावा आटलेल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्यांची मदार जो रूट आणि मोइन अली यांच्यावर असल्याचे दिसून येत आहे. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना अजूनही हवी तशी छाप पाडता आलेली नाही. मॅट प्रायरच्या जागी जोस बटलर संघात आला असून तो कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांचे लक्ष असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण आरोन आणि वृद्धिमान साहा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : दु. ३.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर.
आयसीसीच्या निर्णयावर धोनी नाराज
आयसीसीने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दंड केल्याच्या निर्णयावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने निर्णय घेताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले असल्याचे मत धोनीने व्यक्त केले आहे. ‘‘मला जर व्यक्तिश: विचाराल तर मी या प्रकरणातील आयसीसीच्या निर्णयाने दुखावलो आहे. मला कुणाचे नाव घ्यायचे नाही, पण जेव्हा पंचांनी उपाहाराची घोषणा केली तेव्हा आम्ही मैदानाबाहेर परतत होतो. तेव्हा एका खेळाडूने जडेजाच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्या वेळी मी मध्यस्थी केली आणि आम्ही सीमारेषेपार गेलो. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय देताना बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही,’’ असे धोनीने सांगितले.