‘‘आपल्या आयुष्यात अनेक चांगले-वाईट अनुभव येतात, परंतु प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून जातो. त्यातूनच आपण घडतो. अनुभव हाच आपला महागुरू आहे,’’ असे मत भारताची ग्रँडमास्टर k15द्रोणावली हरिकाने व्यक्त केले. जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा आणि जागतिक सांघिक महिला अजिंक्यपद स्पध्रेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरिकाने या वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मानस व्यक्त केला. या यशानंतर तिच्याशी केलेली बातचीत-

* तुझी २०१५ची सुरुवात सर्वोत्तम झाली आहे, कसे वाटतेय?
हो, २०१५चा आत्तापर्यंतचा प्रवास समाधानकारक झाला आहे. या क्षणी मला खूप आनंद वाटत आहे, परंतु अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे. आशा करते वर्षांअखेपर्यंत असाच आनंद साजरा करण्याची संधी वारंवार मिळो.

* जागतिक सांघिक महिला अजिंक्यपद स्पध्रेत तू वैयक्तिक रौप्यपदक जिंकलेस. या स्पध्रेतील आव्हान किती खडतर होते?
दुसऱ्या पटावर खेळताना भारतासाठी मी रौप्यपदक जिंकले. ही स्पर्धा प्रतिष्ठित होती आणि यात जगातील अव्वल देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सांघिक पदक पटकावणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, परंतु केवळ एका गुणाने ही संधी हुकली. हे पदक सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केल्यामुळे मला मिळाले. संघासाठी मी सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरली, याचा अत्यानंद आहे.

* या स्पध्रेत तुझी आणि कोनेरू हम्पीची कामगिरी उल्लेखनीय होती. तुम्हा दोघींमुळे भारताने चौथ्या स्थानावर झेप घेतली, मात्र केवळ एका गुणाने भारताचे कांस्यपदक हुकले. संघाचे नेमके कुठे चुकले? भारताला कांस्य जिंकणे शक्य होते का?
हा सांघिक खेळ होता आणि आम्ही पाचही जणी भारताच्या चौथ्या स्थानाला जबाबदार आहोत. असे काही क्षण होते, की जेथे आम्ही संधी दवडली. कोणता एक क्षण मी सांगू शकत नाही, मात्र प्रत्येकीने आपापल्या सामन्यात काही सुवर्णसंधी गमावल्या. भारताला कांस्य जिंकणे
सहज शक्य होते. यंदा ही संधी हुकली, परंतु पुढच्या वेळी सुवर्णपदक आमचेच असेल.

* २०१२नंतर जागतिक महिला अजिंक्यपद स्पध्रेत तुला उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. नक्की तुझ्याकडून कुठे चूक झाली?
हो, मला दुसऱ्यांदा उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले, मात्र यातील सकारात्मक बाब लक्षात घ्यायला हवी. सलग दुसऱ्यांदा या स्पध्रेत कांस्यपदक जिंकणे ही मोठी बाब आहे. या अनुभवांतून शिकण्याचा प्रयत्न करतेय आणि भविष्यात त्याचा उपयोग करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. शेवटी अनुभवच आपला महागुरू असतो.

* पुढील आव्हाने काय असतील आणि त्याची तयारी कशी करीत आहेस?
जास्तीत जास्त स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचे आणि खेळात सुधारणा करण्याचे माझे पहिले लक्ष्य आहे. पुढील वेळापत्रक अद्याप निश्चित केलेले नाही.

* तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत काय सांगशील?
१५ वर्षांचा प्रवास थोडक्यात सांगणे थोडे अवघड आहे. बस एवढेच सांगू शकते की, मी अनेक देशांत फिरले, विविध लोकांना भेटले आणि अटीतटीच्या प्रसंगी अनेक आव्हानांचा सामना मी केला, त्यातून बरेच काही शिकले. हा शिकण्याचा प्रवास मी असाच सुरू ठेवणार आहे.