वर्ष १९८६.. अर्जेटिनाने विश्वचषकाला गवसणी घातली.. उपांत्य फेरीमध्ये त्यांनी बेल्जियमचा पाडाव केला होता.. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात एकमेकांशी भिडणार आहेत ते उपांत्यपूर्व फेरीमध्ये.. अर्जेटिनाचा संघ चार विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला असला तरी त्यांचा खेळ हा फक्त आणि फक्त लिओनेल मेस्सीवर आधारित दिसतो. दुसरीकडे बेल्जियमच्या संघाला ‘डार्क हॉस’ समजले जात आहे आणि त्यांच्यामध्ये अर्जेटिनाला धक्का देण्याची ताकद नक्कीच आहे. अर्जेटिनाला पराभूत करण्यासाठी बेल्जियमच्या संघाला मेस्सीसाठी चक्रव्यूह आखावे लागणार आहे, त्यामधून जर मेस्सी सहीसलामत बाहेर पडला तर अर्जेटिनाचा संघ विजय मिळवू शकेल, अन्यथा विश्वचषकातील आणखी एका धक्क्यासाठी फुटबॉल विश्वाला तयार राहावे लागेल.
मेस्सी हा अर्जेटिनाचा अविभाज्य भाग आहे. तीन सामन्यांमध्ये त्याच्या नावावर चार गोल आहेत, पण मेस्सीला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच अर्जेटिनाचा संघ चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. यासाठी अर्जेटिनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी प्रशिक्षक अ‍ॅलेक्झांड्रो सबेला यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अर्जेटिनाकडे चार दमदार आक्रमणपटू आहेत. मेस्सी चांगल्या सुरात दिसत नाही. सर्जिओ अ‍ॅग्युरोला स्नायूंच्या दुखापतीमुळे बेल्जियमच्या सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. गोंझालो हिग्युएन हा अजूनही पहिल्या गोलच्या प्रतीक्षेत आहे, तर अँजेल डी मारियाने स्वित्र्झलडविरुद्ध गोल लगावत संघाला विजय मिळवून दिला असला तरी त्याच्याकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. अर्जेटिना हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जात असून त्याचेच दडपण त्यांच्यावर अधिक असल्याचे बोलले जात आहे.
बेल्जियमचा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार वगैरे नक्कीच नाही, पण मोठय़ा संघांना धक्का देण्याची कुवत त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. इडेन हझार्डसारखा नावाजलेला आक्रमणपटू संघाची मोठी ताकद आहे, पण तरीही त्यांचा संघ एकटय़ा हझार्डवर अवलंबून नक्कीच नाही. संघामध्ये बरेच गुणवान युवा चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी नक्की कोणावर नजर ठेवायची, हे अर्जेटिनासाठी सोपे नसेल.
दोन्ही संघांपैकी अर्जेटिनाचे नाव नक्कीच मोठे आहे, कारण त्यांना फुटबॉलची परंपरा लाभलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मोठय़ा सामन्यांचा चांगला अनुभव आहे, पण तरीही त्यांचा संघ फक्त मेस्सीवर अवलंबून असून त्याला विश्वचषकात लीग सामन्यांएवढी नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही. बेल्जियमचा संघ बरीच आव्हाने यशस्वीरीत्या पेलत इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हा सामना नक्कीच ‘काँटे की टक्कर’ असाच होईल, पण किंचितसे पारडे अर्जेटिनाचे जड वाटत आहे.

गोलपोस्ट
मार्कोस रोजो हा चांगला खेळाडू असला तरी तो या सामन्यामध्ये खेळू शकणार नाही, पण तसे असले तरी जोस मारिआ बसंताला संघात स्थान देण्यात येईल. जोस हादेखील गुणवान खेळाडू असून त्याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. सर्जिओ अ‍ॅग्युरो दुखापतग्रस्त असला तरी तो सामन्याच्या वेळी तंदुरुस्त होईल, असे वाटते.
– अ‍ॅलेक्झांड्रो सबेला, अर्जेटिना

आमचा संघ अर्जेटिनासारखा कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. प्रतिस्पध्र्यासाठी इडेन हझार्ड जेवढा घातक आहे, तेवढेच संघातील ड्रिइस मेरटेंस आणि केव्हिन डे ब्रुयने हे खेळाडूही. इडेन हा संघातील अव्वल खेळाडू आहे, पण असे जरी असले तरी आमच्या संघाची रणनीती एका खेळाडूच्या भोवती नक्कीच नाही.
मार्क विलमोट्स, बेल्जियम

आमने सामने
सामने : २
अर्जेटिना : विजय : १,
पराभव : १
अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी आणि फर्नाडो गागो.

मॅच फॅक्ट्स
*२०१०च्या विश्वचषकापासून गेल्या नऊ सामन्यांपैकी अर्जेटिनाने आठ विजय मिळवले असून उपांत्यपूर्व फेरीत त्यांना जर्मनीने ४-०ने हरवले होते.
*युरोपीयन संघांबरोबरच्या गेल्या १९ सामन्यांपैकी अर्जेटिनाला सहा सामने जिंकता आले आहेत.
*आतापर्यंतच्या विश्वचषकांतील सामन्यांमध्ये बेल्जियमने ६ गोल ७० मिनिटांनंतर केले आहेत, तर चार गोल बदली खेळाडूंनी लगावले आहेत.