जर्मनीला १-१ अशा बरोबरीत रोखले
जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेतील ‘ब’ गटातील लढतीत यजमान भारताने जर्मनीला कडवी झुंज दिली. आकाशदीप सिंगच्या निर्णायक गोलच्या जोरावर भारताने हा सामना १-१ असा बरोबरीत रोखून गुणखाते उघडले. पहिल्या सामन्यात अर्जेटिनाकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर भारताने या लढतीत दाखवलेला संघर्ष कौतुकास पात्र होता. जर्मनीनेही गुणाची कमाई केली.
आक्रमक सुरुवात करणाऱ्या जर्मनीने निकलास वेल्लेनने अप्रतिम मैदानी गोलच्या जोरावर सहाव्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सत्रापर्यंत भारताने चेंडूवर ताबा मिळवून जर्मनीला केवळ एकाच गोलवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. अखेरच्या सत्रात आकाशदीपने निर्णायक गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणत सलग दुसरा पराभव टाळला.
ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलियाचा विजय सिमॉन मँटेलच्या दोन गोलच्या जोरावर ग्रेट ब्रिटन संघाने जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेच्या ‘अ’ गटातील पहिल्याच लढतीत कॅनडावर ३-१ असा विजय साजरा केला. मँटेलने दुसऱ्याच मिनिटाला गोल करताना ब्रिटनला १-० आघाडी मिळवून दिली, परंतु कॅनडाच्या मार्क पिअरसनने अचूक गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात मँटेल आणि अ‍ॅलस्टर ब्रोगडॉन यांनी प्रत्येकी एक गोल करून ब्रिटनचा ३-१ असा विजय पक्का केला. ‘अ’ गटातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानेही सहज विजयासह आगेकूच केली. जेमी ड्वेयरच्या एकमेव गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १-० अशा फरकाने बेल्जियमचा पराभव केला. पाच वेळा एफआयएचचा सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ड्वेयरने २२व्या मिनिटाला बेल्जियमची बचावफळी भेदून हा अप्रतिम गोल केला.