भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी खालावली की चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक होतो. चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाचं झालेलं ट्रोलिंग आणि काही खेळाडूंवर झालेले फिक्सींगचे आरोप हे याबद्दलचं ताजं उदाहरण आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या संघाला पाठींबा दर्शवला आहे.

पहिल्या वन-डे सामन्याआधी सचिनने पत्रकारांशी संवाद साधला. “प्रत्येक वेळी माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेतच. मग तो पुरुषांचा संघ असो किंवा महिलांचा, त्यांच्या चांगल्या आणि वाईट काळात त्यांना पाठींबा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. क्रिकेट हा खेळ आहे, आणि खेळात हार-जीत होतच असते. मात्र आपल्या संघाच्या पाठीमागे कायम उभं राहणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं”, असं सचिन म्हणाला.

अवश्य वाचा – पहिल्या वन-डे भारत विजयी, धवन शतकवीर

संघ भारतात खेळत असो किंवा बाहेरच्या देशांमध्ये, खेळाडूंचा फिटनेस हा सध्याच्या काळात खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सतत व्यस्त वेळापत्रकामधून आपला फिटनेस कायम राखणं हे प्रत्येक खेळाडूसाठी आता महत्वाचं झालेलं आहे. सध्या भारताच्या वन-डे संघात प्रत्येक खेळाडूला आपली जागा पक्की करण्यासाठी झगडावं लागत आहे. मात्र सचिनच्या दृष्टीकोनातून भारतीय संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. संघात कोणाला जागा द्यायची यावर संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागत असेल, तर याचा अर्थ भारताची राखीव फळी ही मजबूत आहे, असं सचिन म्हणाला. त्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.