मोठ्या कालखंडानंतर टीम इंडियामध्ये युवराज सिंगची निवड झाल्यामुळे एकीकडे त्याचे चाहते कमालीचे खूश झाले होते. तर दुसरीकडे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याची खिल्लीही उडवण्यात आली होती. एका ट्विटर युजरने तर युवराजच्या निवडीच्या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ५०० व १ हजार रूपयांच्या नोटेशी केली होती. बीसीसीआय अजूनही ५०० व १ हजार रूपयांच्या जुन्या नोट घेत असल्याची टिप्पणी त्याने ट्विटरवर केली होती. परंतु, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत युवराज सिंगने कटकमध्ये शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आपल्या टिकाकारांची बोलती बंद केली आहे. त्याच्या या खेळीचे वीरेंद्र सेहवागने त्याच्या स्टाइलमध्ये कौतुक केले आहे. फक्त जुन्या नोटा चलनातून बाद झाले आहेत. युवराज आणि धोनी नाही, असे ट्विट करून सेहवागने युवीच्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.

युवराज सिंगने कटक येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात १५० धावांची शानदार खेळी केली होती. त्याने ९८ चेंडूत शतक ठोकले होते. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताची २५ धावांवर तीन विकेट अशी दुरावस्था होती. त्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यांनी टीम इंडियाला सावरत २५६ धावांची भागिदारी केली. युवी १५० धावांवर बाद झाला होता. या दोघांनी इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय सामन्यातील चौथ्या विकेटसाठीचा भागिदारीचा पाच वर्षे जुना विक्रम मोडला.
युवराज आणि धोनीच्या या शानदार खेळीनंतर ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. युवराजसाठी हा सामना खास राहिला. कारण कर्करोगातून सावरल्यानंतर युवराजने एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकावले. तब्बल सहा वर्षांनंतर त्याने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले.
वीरेंद्र सेहवागने यावर ट्विटमध्ये म्हटले, ‘या माणसाने कर्करोगावर मात केली आहे. आज त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवरही मात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचे गुण प्रत्येकाने युवराजकडून शिकावेत. युवराज मला तुझा अभिमान आहे.’