१३२ वर्षांत पहिल्यांदा ईपीएलचे जेतेपद; सर्वाधिक ७७ गुणांसह टॉटनहमवर कुरघोडी; चेल्सीच्या बरोबरीमुळे शिक्कामोर्तब
जगात अशक्य असे काहीच नाही.. प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अशक्यप्राय लक्ष्यही गाठता येते.. याचा प्रत्यय लिस्टर सिटी क्लबने दाखवून दिला. इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेच्या २०१४-१५च्या हंगामात स्पध्रेतून हद्दपार होण्याची नामुश्की टाळण्यासाठी झटणारा हा क्लब २०१५-१६ हंगामाचा जेता ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, प्रचंड मेहनत आणि जेतेपदाचा निर्धार मनाशी पक्का करून मैदानात उतरलेल्या लिस्टर क्लबने ईपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. लिस्टर आणि टॉटनहम हॉटस्पर यांच्यात जेतेपदासाठी रंगलेली चुरस चेल्सीने मंगळवारी संपुष्टात आणली. १३२ वर्षांत लिस्टर सिटीने पहिल्यांदा ईपीएलच्या जेतेपदाचा मान पटकावला.
चेल्सी आणि टॉटनहम यांच्यातील लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या टॉटनहमने विजय मिळवला असता, तर लिस्टरला जेतेपदासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली असती. त्यामुळे लिस्टरचे खेळाडू आणि चाहते या लढतीकडे डोळे लावून बसले होते. सामन्याच्या ८०व्या मिनिटापर्यंत २-१ अशा आघाडीवर असलेल्या टॉटनहमला ईडन हजार्डने जबरदस्त धक्का दिला. हजार्डच्या निर्णायक गोलने चेल्सीने ही लढत २-२ अशी बरोबरीत रोखून लिस्टरचा जेतेपदावरील दावा मजबूत केला. लिस्टरने ३६ सामन्यांनंतर ७७ गुणांची कमाई केली आहे आणि टॉटनहमच्या खात्यात ७० गुणच आहेत. या निकालानंतर प्रमुख खेळाडू जेमी व्हर्डीच्या घरी जमलेल्या लिस्टरच्या खेळाडूंनी ‘चॅम्पियन्स! चॅम्पियन्स! ओले. ओले. ओले’ हे विजयी गाणे गात आनंद साजरा केला. व्हर्डीच्या घराबाहेरही लिस्टरच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
‘‘आम्ही जेतेपद पटकावले यावर कुणाचाही विश्वास बसत नाही, परंतु आम्ही हे करून दाखवले. या जेतेपदाचे आम्हीच हकदार होतो,’’ अशी प्रतिक्रिया लिस्टरचा कर्णधार वेस मॉर्गन याने दिली. दोन वर्षांपूर्वी व्हर्डी आणि संघातील बहुतेक सहकारी यांच्यावर ईपीएलमधून हद्दपार होण्याची नामुश्की ओढावली होती, परंतु त्यांनी अखेरच्या लढतीत सांघिक खेळ करून ही नाचक्की टाळली. मॉर्गन म्हणाला, ‘‘गेल्या हंगामात चाहत्यांनी आमचा खेळ पाहिला होता. आम्ही हद्दपार व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते, परंतु आम्ही संघर्ष केला आणि लोकांना चुकीचे ठरवले. यंदाच्या हंगामात हळूहळू जेतेपदाचा पाया रचला, परंतु आम्ही जेतेपद पटकावू असे कुणालाही वाटले नसावे.’’

प्रसारमाध्यमांची कौतुकाची थाप
‘झिरो टू हिरो’, लिस्टर सिटी क्लबच्या ईपीएल जेतेपदानंतर इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी केलेले हे वर्णन. गत हंगामात स्पध्रेतून हद्दपार होण्याच्या स्थितीत असलेल्या लिस्टरने जिद्दीने खेळ करून यंदाच्या हंगामाचे अजिंक्यपद पटकावले. त्यांची ही कामगिरी सर्वाना थक्क करणारी आहे. मेट्रो या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ईपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम विजय’ अशा मथळ्याखाली लिस्टरचे कौतुक केले आहे. ‘‘कोणत्याही खेळात याहून असंभाव्य विजय असूच शकत नाही,’’ असा उल्लेख ‘इकॉनॉमिक’ मॅगझीनने केला आहे. ‘लिस्टर सिटी; इंग्लंडचा राजा’ असा मथळा ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने दिला आहे.

नृत्य, विजयी गाण्याने धरलेला ताल आणि निळ्या रंगांच्या जर्सीने न्याहून निघालेला परिसर.. सोमवारची मध्यरात्र ही लिस्टर सिटीच्या चाहत्यांची विजयी आनंद साजरा करण्याची होती. लिस्टर शहरातील किंग पॉवर स्टेडियमबाहेर हजारोंच्या संख्येने लिस्टर क्लबचे चाहते जमले होते. कोणी नृत्य करत होते तर कोणी विजयी गाणी गात होते. १३२ वर्षांची जेतेपदाची प्रतीक्षा त्या मध्यरात्री संपली होती, त्याचाच तो जल्लोष होता. स्टेडियमबाहेरील परिसर निळ्या रंगात रंगला होता.

 

Untitled-7

Untitled-8