तुफान फॉर्मात असणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून त्याने साकारलेल्या दोन गोल्सच्या बळावर बार्सिलोनाने झारागोझावर ३-१ असा विजय मिळवून ला लीगा फुटबॉल चषक स्पर्धेतील या मोसमाची सुरुवात दणक्यात केली.
११ विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवणाऱ्या बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदला सहा गुणांच्या फरकाने मागे टाकून अव्वल स्थान कायम राखले आहे. गतविजेता रिअल माद्रिद संघ बार्सिलोनापेक्षा आठ गुणांनी पिछाडीवर आहे. १५व्या मिनिटाला जॉर्डी अल्बाच्या क्रॉसवर चेंडूवर नियंत्रण मिळवल्यानंतर मेस्सीने झारागोझाचा गोलरक्षक रॉबेटरे याला चकवून पहिला गोल नोंदवला. मात्र बार्सिलोनाला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. फ्रान्सिस्को माोन्टानेस याने २३व्या मिनिटाला गोल करून सामन्यात बरोबरी साधली. पाच मिनिटानंतर अ‍ॅलेक्स साँगने अप्रतिम गोल करून बार्सिलोनाला २-१ असे आघाडीवर आणले. मेस्सीने ६०व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचा हा या मोसमातील १७वा गोल ठरला.
दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सर्जीओ अ‍ॅग्युरो आणि कालरेस टेवेझ यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलमुळे मँचेस्टर सिटीने अ‍ॅस्टन व्हिलाचा ५-० असा धुव्वा उडवून २८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. नॉर्विच सिटीने मँचेस्टर युनायटेडला १-० असे हरवल्यामुळे अव्वल स्थानी झेप घेण्याची युनायटेडची संधी हुकली. ते २७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चेल्सी आणि लिव्हरपूल यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. अर्सेनलने टॉटनहॅमचा ५-२ असा पराभव केला.