आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील सहभागानंतर मौन बाळगल्यामुळे भारताचा महेंद्रसिंग धोनीचा अनेकांना राग आला आहे. मात्र ‘साफसफाई’ मोहीम राबवल्यास, क्रिकेट हा खेळ स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यात मदत होईल, असे समर्पक उत्तर धोनीने दिले आहे.
आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झालेल्या धोनीने स्पॉट-फिक्सिंग संदर्भात विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देणे टाळले. ‘‘साफसफाई मोहीम राबवणे सर्वाच्याच हिताचे ठरणार आहे. त्यामुळे आम्हालाही स्वच्छ प्रतिमा राखता येईल,’’ असे धोनीने सांगितले. आयपीएल भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमण्यात आलेल्या मुदगल समितीने चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप लावले आहेत. मात्र या प्रश्नांना उत्तरे देणे त्याने टाळले.