वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर महेंद्रसिंह धोनी सध्या विश्रांती घेतो आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता थेट श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि एकमेव टी-२० सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. मात्र तोपर्यंत आपल्या हाती असलेल्या फावल्या वेळेत महेंद्रसिंह धोनीने एका नवीन क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आहे. ‘सेव्हन’ या नावाने महेंद्रसिंहग धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे. रांची येथे धोनीच्या पहिल्या वहिल्या दुकानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी धोनीने आपला खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

७ हा आकडा धोनीसाठी शुभ आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतानाही धोनी ७ क्रमांकाची जर्सी घालतो. त्यामुळे आगामी काळात धोनीच्या या नवीन कलेक्शनवर त्याचे चाहते मंडळी तुटून पडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

चॅम्पियन्स करंडक आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीला फारशी चांगली कामगिरी बजावता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. राहुल द्रविडसारख्या माजी खेळाडूने तर धोनी आणि युवराजला संघात पर्याय शोधला पाहिजे अस वक्तव्यही केलं होतं. मात्र भारताचे नवीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघातील काही खेळाडूंनी धोनीला आपला पाठींबा दर्शवला. त्यामुळे येत्या काळात मैदानाप्रमाणेच धोनी आपल्या नवीन क्षेत्रात चांगली कामगिरी करेल असा आशावाद त्याच्या चाहत्यांना आहे.