क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या लिजंड्स क्लबच्या मांदियाळीत समावेश
‘‘क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी सांगलीहून रात्रीची रेल्वे पकडून मुंबईत यायचो. समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर अशा ब्रेब्रॉर्न स्टेडियममध्ये बसून सामने पाहताना अप्रूप वाटत असे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (सीसीआय) गौरवशाली परंपरा आणि वातावरण मनाला भुरळ पाडत असे. नॉर्थ स्टँडमध्ये बसून सामने पाहताना या परंपरेचा आपण कधी भाग होणार असे वाटायचे. टेनिसच्या निमित्ताने क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली. बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित केल्यानंतर कारकीर्दीत अनेकदा सीसीआयमध्ये खेळलो आणि आज या क्लबच्या प्रतिष्ठेच्या अशा लिजंड्स क्लबचा मानकरी होण्याची संधी मिळते आहे. बॅडमिंटनच्या निमित्ताने असंख्य माणसे, संस्थांचा स्नेह लाभला आणि आयुष्य समृद्ध केले,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सीसीआयतर्फे आयोजित कार्यक्रमात लिजंड्स क्लबमध्ये नाटेकर यांचा ८३व्या वाढदिवशी समावेश करण्यात आला. बॅडमिंटनमधील माजी खेळाडूंचा स्नेहमेळावा ठरलेल्या या कार्यक्रमाला नाटेकर यांचे कुटुंबीय आणि समकालीन खेळाडू उपस्थित होते.
राजसिंग डुंगरपूर यांच्या संकल्पनेतून लिजंड्स क्लबची निर्मिती झाली. बॅडमिंटनप्रती अतुनलीय योगदानाकरता नंदू नाटेकर यांचा क्लबमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मांदियाळीत समावेश होणारे ते पहिले क्रिकेटेत्तर खेळाडू आहेत. नाटेकर यांच्या बरोबरीने भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचाही क्लबमध्ये समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती लिजंड्स क्लबचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांनी दिली.
‘‘स्पर्धेच्या निमित्ताने वर्धा येथे गेलो होतो. वध्र्याजवळ असणाऱ्या पवनार येथील आश्रमात विनोबाजी भावे यांना भेटण्याची इच्छा होती. त्यावेळी विनोबाजी पवनारमध्ये होते. निर्मलाताई देशपांडे यांना तशी विनंती केली. आम्ही आश्रमात पोहोचलो. मात्र विनोबाजींचे मौनव्रत असल्याचे समजले. त्यांच्याशी बोलता येणार नसल्याने निराश झालो. त्यावेळी निर्मलाताईंनी विनोबाजींच्या कानात काहीतरी सांगितले. पुढच्या क्षणाला विनोबाजींनी ‘जय बॅडमिंटन’ असे म्हणत आशीर्वाद दिला. निर्मलाताईंनी त्यांच्या कानात नंदू नाटेकर आल्याचे सांगितले होते. त्यांच्यासारख्या ऋषीतुल्य माणसाचा आशीर्वाद खूपच मोलाचा होता,’’ अशी आठवण नाटेकर यांनी सांगितली. ‘‘मी खेळत असताना मलाही जाहिरात करण्यासाठी प्रस्ताव आले होते. तो काळ संघटक तसेच मार्गदर्शकांचे ऐकण्याचा होता. त्यांनी खेळावर लक्ष केंदित करायला सांगितले आणि जाहिरात करण्यास नकार दिला,’’ अशा गंमतीदार आठवणीला नाटेकर यांनी उजाळा दिला.
‘‘प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, उदय पवार या खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाप्रती योगदान दिले आहे. बॅडमिंटनने आनंद, समाधान, पैसा-प्रसिद्धी दिली. मात्र बॅडमिंटन सोडल्यानंतर मी टेनिस आणि संगीत यांच्यावर लक्ष केंद्रित केले. बॅडमिंटनसाठी काही करता आले नाही. प्रशिक्षक होण्यासाठी वेगळे कौशल्य लागते. ते माझ्याकडे नाही,’’ अशी खंत नाटेकर यांनी व्यक्त केली.

‘‘आताचे खेळाडू एकेरी किंवा दुहेरी असा एकच पर्याय निवडतात. मात्र नाटेकर एकाचवेळी पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारांत खेळत असत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची जेतेपदे त्यांच्या अद्भुत प्रतिभेची साक्ष आहेत. प्रतिस्पध्र्याला उद्देशून वाचाळपणा करण्यापेक्षा रॅकेटने प्रत्युत्तर देणे हे त्यांचे तत्व होते. खेळभावनेचा त्यांनी नेहमीच आदर केला,’’ अशा शब्दांत माजी बॅडमिंटनपटू आणि संघटक शिरीष नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्भुत खेळाच्या जोरावर आपली छाप उमटवणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंत त्यांचा समावेश होतो. प्रतिष्ठेच्या थॉमस चषकातली त्यांची कामगिरी संस्मरणीय अशी आहे. कारकीर्दीत जपलेल्या अफलातून सातत्यासाठी त्यांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ अशी उपाधी देण्यात आली,’’ अशी आठवण नाटेकर यांचे समकालीन रमेश चढ्ढा यांनी सांगितली.