आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये दुहेरीमध्ये ठसा उमटवायचा असेल तर दुहेरीसाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी, असे मत बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच अश्विनी आणि ज्वाला गट्टा जोडीने कॅनडा ग्रां.प्रि. स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली होती. मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि या जोडीमधील वादाच्या पाश्र्वभूमीवर अश्विनी बोलत होती.
‘चीन, मलेशिया, कोरिया या बॅडमिंटन विश्वातील मातब्बर देशांमध्ये दुहेरीसाठी स्वतंत्र प्रशिक्षक आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र शिबीर आयोजित करण्यात येते. अधिकाअधिक दुहेरीच्या जोडय़ा तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. आपल्याकडे दुहेरीचे खेळाडू उपेक्षितच राहतात’, असे तिने पुढे सांगितले.
गोपीचंदचे नाव न घेता अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली ‘ज्वाला आणि मी दोन वेगळ्या शहरात सराव करतो. रिओ ऑलिम्पिकसाठी टॉप योजनेसाठी निवड झालेल्या बॅडमिंटनपटूंसाठी फिजिओ, आहारतज्ज्ञ, ट्रेनर यांची सुविधा आहे. आम्हाला वैयक्तिक खर्चातून हे करावे लागते. लक्ष्य ऑलिम्पिक योजनेसाठी आम्ही क्रीडा मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात दोनच बॅडमिंटनपटूंना संधी मिळते. मात्र तरीही एकेरीच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल स्पर्धा आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत, मात्र तरीही आमचा या योजनेसाठी विचार करण्यात आला नाही. योजनेशी संबंधित व्यक्तींना योग्य व्यक्तीने माहिती तसेच सल्ला दिलेला नाही.’
ज्वालाच्या आक्रमक भूमिकेविषयी विचारले असता अश्विनी म्हणाली, ‘ज्वाला थेट आणि परखड बोलते. पण ती जे बोलते ते सत्य आहे. त्यामुळे माझा तिला पाठिंबा आहे. आम्ही दोघीही दुहेरीच्या खेळाडू आहोत. आम्हा दोघींनाही सामाईक त्रासाला सामोरे जावे लागते.’
ऑलिम्पिकला जागतिक क्रमवारीतील अव्वल सोळा जोडय़ा पात्र ठरतात. आता आम्ही १३व्या स्थानी आहोत. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्यापेक्षा अव्वल दहामध्ये धडक मारण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी आमचा कसून सराव सुरू आहे. दुहेरीसाठी मलेशियाच्या प्रशिक्षकांची नियुक्ती झाल्याचे वृत्त वृत्तपत्रात वाचले, पण ॉयाविषयी संघटनेतर्फे काहीही सांगण्यात न आल्याचे अश्विनीने स्पष्ट केले.