आयपीएलमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या राजकोट संघाचे नामकरण गुजरात लायन्स असे करण्यात आले आहे. सुरेश रैना या संघाचे नेतृत्व करणार असून ऑस्ट्रेलियन फलंदाज ब्रॅड हॉज या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. नवी दिल्लीत मंगळवारी इंटेक्स मोबाइलचे मालक केशव बन्सल यांनी  ही घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे दोन वर्षांसाठी निलंबन केले होते. त्यानंतर यंदाच्या मोसमासाठी आयपीएलमध्ये पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघाची वर्णी लागली होती.
या संघात न्युझीलंडचा ब्रेन्डन मॅक्युलम, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो, भारताचा रविंद्र जाडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉल्कनर यांचाही समावेश आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या खेळाडू निवड प्रक्रियेत राजकोट संघाने या सगळ्यांना खरेदी केले होते.
सुरेश रैना यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाकडून खेळत होता. २००७ मध्ये आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून रैनाने या स्पर्धेचा एकही हंगाम चुकविलेला नाही. आत्तापर्यंत त्याने आयपीएलमध्ये १३२ सामने खेळले आहेत.