दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळण्याची आशा

गेल्या काही दिवसांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या पाठीमागे दुखापतींचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांच्या चार परदेशी खेळाडूंना दुखापतींमुळे मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे त्यांचा गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सामना असला तरी ती त्यांची मुख्य झुंज असेल ती दुखापतींशी. दुसरीकडे दिल्लीचा संघ चांगलाच फॉर्मात आला असून त्यांनी दुसरे स्थानही मिळवले आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या सुपरजायंट्स संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये पुण्याला सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे त्यांना जर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचे असले तर त्यांना जवळपास सर्वच सामने जिंकावे लागणार आहे. अ‍ॅल्बी मॉर्केल, आर. अश्विन, थिसारा परेरा आणि अशोक दिंडासारखे नावाजलेले गोलंदाज संघात असले तरी त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणेला यंदा छाप पाडता आलेली नाही. धोनीलाही लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही.

या हंगामात दिल्लीकडून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. राहुल द्रविडचे मार्गदर्शन आणि झहीर खानचे नेतृत्व यामुळे संघात संजीवनी आली आहे. गेल्या सामन्यात रिषभ पंत आणि क्विंटन डी’कॉक यांनी शतकी सलामी देत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. ख्रिस मॉरिस आणि कालरेस ब्रेथवेटसारखे गुणी अष्टपैलू संघात आहेत. गोलंदाजीमध्ये झहीर आणि फिरकीपटू शाहबाझ नदीम यांच्याकडून सातत्याने तिखट मारा पाहायला मिळत आहे. सध्याचा फॉर्म पाहता पुण्यापेक्षा दिल्लीचे पारडे जड समजले जात आहे, पण धोनीच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे पुण्याचा संघ कधीही सामन्यात पुनरागमन करू शकतो.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.  प्रक्षेपण : सोनी सिक्स,सेट मॅक्स.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार),क्विंटन डी’कॉक, जेपी डय़ुमिनी, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, कालरेस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, रिषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नॅथन कल्टर-निल, इम्रान ताहिर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर, प्रत्युष सिंग.

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डय़ू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथ, मिचेल मार्श, जसकिरण सिंग, आर. अश्विन, अंकित चव्हाण, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहार, स्कॉट बोलॅण्ड, पीटर हॅण्डस्कॉम्ब, अ‍ॅडम झाम्पा.