सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीत एफ.फित्रियन विरुद्ध २१-८, २१-१९ असा विजय प्राप्त केला. या विजयासह भारताने इंडोनेशियावर ३-१ अशा मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.

सिंधूसोबतच एस.रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनीही विजयाची नोंद करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. दुसऱ्या बाजूला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर अजय जयरामकडून अपेक्षा असताना त्याने निराशा केली. अजय जयराम याचा १२-२१, ७-२१ असा मानहानीकारक पराभव झाला. अवघ्या २७ मिनिटांत सामना संपुष्टात आला.

पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी.सुमेथ रेड्डी यांनी ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या माथियास बोए, कार्स्टन मोगेनसेन जोडीशी दोन हात केले. पण डेन्मार्कच्या जोडीने ३३ मिनिटं चाललेल्या सामन्यात भारतीय जोडीवर २१-१७, २१-१५ ने असा विजय प्राप्त केला. पी.व्ही.सिंधूने मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.