रिअल माद्रिदने १२ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारण्याच्या दिशेने ठोस पाऊल पुढे टाकले. करिम बेंझेमाने सुरुवातीलाच केलेल्या गोलमुळे रिअल माद्रिदने गतविजेत्या बायर्न म्युनिकवर १-० अशी सरशी साधली.
उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात फॅबियो कोएंट्राओच्या क्रॉसवर फ्रान्सच्या करिम बेंझेमाने रिअल माद्रिदला आघाडीवर आणले. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अँजेल डी मारिया यांना या आघाडीत आणखी भर घालता आली असती. पण पहिल्या सत्राआधी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. बायर्न म्युनिकने चेंडूवर  अधिक वेळ ताबा मिळवला. रिअल माद्रिदचा गोलरक्षक आयकर कसिल्लास त्यांच्यासमोर भिंत बनून उभा होता. सामना संपण्याच्या पाच मिनिटेआधी कसिल्लासने मारियो गोएट्झेचा प्रयत्न हाणून पाडत बायर्न म्युनिकला बरोबरी साधण्यापासून रोखले. आता बायर्न म्युनिकला अंतिम फेरी गाठण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बायर्न म्युनिकचा गोलरक्षक मॅन्युएल न्यूएरने रोनाल्डोचा गोल करण्याचा प्रयत्न धुडकावून लावला. अंतिम २० मिनिटांत दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पराभवानंतरही बायर्न म्युनिकचा कर्णधार फिलिप लॅमने पुढील सामन्यात दोन गोलांच्या फरकाने विजय मिळवू अशी आशा व्यक्त केली. रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांनी मात्र खेळाडूंचे कौतुक केले आहे.
‘‘चेंडूवर जास्त वेळ ताबा मिळवता आला नसला तरी आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. आम्ही या सामन्यात अनेक आघाडीवीरांना अधिक संधी दिली,’’ असे अँकलोट्टी म्हणाले.