कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभवाचा धक्का
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि स्पर्धेत अग्रमानांकन मिळालेला नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियन टेनिस खुल्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. या दोघांसह पुरुष गटात रॉजर फेडरर, केई निशिकोरी, निक कुर्यिगास यांनी तर महिलांमध्ये मारिया शारापोव्हा, पेट्रा क्विटोव्हा, युझेनी बोऊचार्ड यांनी विजयी आगेकूच केली. भारताच्या युकी भांब्रीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
गेल्या वर्षी झंझावाती फॉर्मात असलेल्या जोकोव्हिचने नव्या वर्षांतही तोच सूर कायम राखत दक्षिण कोरियाच्या च्युंग ह्य़ुआनवर ६-३, ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर फेडररने निकोलाझ बॅशिआश्वलीचा ६-२, ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई विभागाचा झेंडा अभिमानाने फडकावणाऱ्या केई निशिकोरीने फिलीप कोहलश्रायबरला ६-४, ६-३, ६-३ असे नमवले. जो विलफ्रेड सोंगाने मार्कोस बघदातीसवर ६-४, ४-६, ६-४, ६-२ अशी मात केली. गेल्या वर्षी आक्षेपार्ह वर्तनामुळे सहा महिने बंदीची शिक्षा भोगलेल्या ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्यिगासने पाब्लो कॅरेनो बुस्तावर ६-२, ७-५, ६-२ असा विजय मिळवला.
जेतेपदाची प्रबळ दावेदार सेरेना विल्यम्सने कॅमिला गिओरर्गीवर ६-४, ७-५ अशी मात करत दुसऱ्या फेरीत स्थान पटकावले. २०१५ मध्ये सेरेनाला कॅलेंडर वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावण्याची संधी होती. मात्र अमेरिकन खुल्या स्पर्धेत दुखापतीमुळे सेरेनाला उपांत्य फेरीत पराभवाला सामारे जावे लागले. त्यानंतर दुखापतीमुळे सेरेनाला एकही लढत खेळता आलेली नाही. मात्र वयाची तिशी ओलांडल्यानंतरही जेतेपदाची ऊर्मी पक्की असलेल्या सेरेनाने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या लढतीत विजयासह सेरेनाने जेतेपदापर्यंतची वाटचाल करण्यासाठी तय्यार असल्याचे सिद्ध केले आहे. अन्य लढतींमध्ये सौंदर्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने जपानच्या नाओ हिबिनोचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला.
पेट्रा क्विटोव्हाने ल्युसिका कुमखुमवर ६-३, ६-१ अशी मात केली. कॅरोलिन प्लिसकोव्हाने समंथा स्टोसूरचा ६-४, ७-६ असा पराभव केला. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने ख्रिस्तिना मॅकहालेवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला. कझाकिस्तानच्या युलिआ पुतिनेत्सोव्हाने कॅरोलिन वोझ्नियाकीवर १-६, ७-६, ६-४ अशी मात करत सनसनाटी विजयाची नोंद केली.

युकी माघारी
गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूत स्थान पटकावणाऱ्या युकी भांब्रीला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र सलामीच्या लढतीतच जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या टॉमस बर्डीचचे आव्हान समोर असल्याने युकीला गाशा गुंडाळावा लागला. बर्डीचने ५०व्या ग्रँड स्लॅम लढतीत युकीवर ७-५, ६-१, ६-२ अशी मात केली. गेल्या वर्षी याच स्पर्धेत पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य फेरीत दाखल झालेल्या युकीला अँडी मरेचा सामना करावा लागला होता. दिमाखदार फॉर्ममध्ये असणाऱ्या मरेला युकीने विजयासाठी संघर्ष करायला लावला होता. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच सलामीच्या लढतीतूनच माघारी परतावे लागण्याचे युकीचे नशीब बदलले नाही.