महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारने पोलिस दलात मोठ्या हुद्द्याची नोकरी जाहीर केली. त्यापाठोपाठ तिची सहकारी सुषमा वर्मा हिलाही हिमाचल प्रदेश सरकारने पोलिस दलात पोलिस उप-अधिक्षक पदाची नोकरी जाहीर केली आहे. भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडलेल्या सुषमाने भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांनी सुषमाच्या खेळीचं कौतुक करताना तिला पोलिस दलात नोकरी जाहीर केली आहे. सुषमाच्या खेळीने हिमाचल प्रदेशमधल्या छोट्या गावांमधल्या मुलींना खूप प्रेरणा मिळेल. यासाठी तिने केलेल्या कामगिरीचा योग्य तो गौरव होणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

१९९२ साली जन्मलेल्या सुषमाने शाळेपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. शाळेत असल्यापासून सुषमा यष्टीरक्षक म्हणून खेळत होती. सुषमाच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशच्या संघाने १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर सुषमासाठी भारतीय संघाची दार उघडली. भारतीय संघात हिमाचल प्रदेशचं नेतृत्व करणारी सुषमा ही पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

मात्र स्थानिक पातळीवर असलेल्या कमी संधी पाहता सुषमाने रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुषमाने मिताली राज, पुमन राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्यासोबत खेळायला सुरुवात केली.