भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक शिलेदारांसाठी अ संघाचे सामने रंगीत तालीम असते. भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांमधील दुसरा चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामना बुधवारपासून चेन्नई येथे सुरू होत आहे. बंगळुरू येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित झाली होती. दुसऱ्या कसोटीचे वैशिष्टय़ म्हणजे भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव म्हणून कोहली या सामन्यात खेळणार आहे. कोहली सहभागी होणार असला तरी संघाचे नेतृत्व चेतेश्वर पुजाराकडेच असणार आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारत अ संघातील अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांनी शानदार कामगिरी केली होती. मिश्राची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे तर ओझा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आतुर आहे.
चेन्नईची कसोटी वेगवान गोलंदाजांना साहाय्य करील अशी अपेक्षा आहे. बंगळुरू कसोटीची खेळपट्टी संथ आणि धीमी असल्याने दोन्ही संघांच्या फलंदाजांची धावगती कूर्म होती. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा या भारताच्या कसोटी संघातील शिलेदारांवर फलंदाजीची भिस्त आहे. लोकेश राहुलला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा सलामीला येणार आहे. विजय शंकर आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. अमित मिश्रा आणि उमेश यादव यांना या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याऐवजी वरुण आरोन आणि जयंत यादव यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रग्यान ओझाकडून पहिल्या कसोटीतील कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.

विराटच्या समावेशामुळे संघाला बळकटी प्राप्त झाली आहे. युवा खेळाडू विराटकडून अनेक गोष्टी शिकू शकतात. त्यांच्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. माझ्यासाठी धावा करणे महत्त्वाचे आहे. कठीण खेळपटय़ांवर धावा करणे अवघड असते. वातावरणात आद्र्रता जास्त होती. अशा वेळी एकाग्रता राखणे कठीण होते. मात्र मला हळूहळू सूर गवसतो आहे. संघाच्या विजयात योगदान देणे आवश्यक आहे.

चेतेश्वर पुजारा, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार

 

संभाव्य प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ संघ- चेतेश्वर पुजारा (कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, वरुण आरोन, बाबा अपराजित, श्रेयस गोपाळ, श्रेयस अय्यर, अमित मिश्रा, अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, करुण नायर, नमन ओझा, प्रग्यान ओझा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ- उस्मान ख्वाजा (कर्णधार), मॅथ्यू वेड, सीन अबॉट, अ‍ॅश्टन अगर, कॅमेरून बॉयस, जो बर्न्‍स, नॅथन कोल्टिअर नील, कॅल्युम फग्र्युसन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन, जेम्स पॅटिन्सन, गुिरदर संधू, अ‍ॅडम झम्पा, अ‍ॅण्ड्रय़ू फेकटे, स्टीव्हन ओ कॅफी.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १
वेळ : सकाळी ९.३० पासून