जर्मनीचा संघ म्हणजे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ याचा प्रत्यय घडवत इराणने त्यांचा ४-० असा धुव्वा उडवला आणि कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीत धडक मारली. सलग दुसरा विजय नोंदवत त्यांनी साखळी गटात आघाडीचे स्थान मिळवले आहे.

जर्मनीच्या फुटबॉलपटूंमध्ये व्यावसायिकता नसानसांत भिनलेली असते असे म्हटले जाते. मात्र याच जर्मनीच्या खेळाडूंचे आव्हान इराणच्या झंझावातापुढे पोकळ ठरले. पूर्वार्धातच इराणने २-० अशी आघाडी घेत जर्मनीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. नेहरू स्टेडियमवर जमलेल्या प्रेक्षकांना इराणने आक्रमक खेळाचा आनंद मिळवून दिला. त्यांचे पहिले दोन्ही गोल युनूस डेल्फीने केले. त्याने सहाव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. पुन्हा ४२व्या मिनिटाला त्याने संघाचा व स्वत:चा दुसरा गोल नोंदवला. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला अलाहयार सय्यदने गोल करीत इराणची बाजू बळकट केली. ७५व्या मिनिटाला वाहिद नामदारीने सईद करिमीच्या पासवर अचूक फटका मारला व इराणचा चौथा गोल नोंदवला.

गिनीने कोस्टा रिकाला बरोबरीत रोखले

इब्राहिम सौमाहने ८१व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळेच गिनी संघाने कुमारांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोस्टा रिकाला २-२ असे बरोबरीत रोखले. मात्र या बरोबरीमुळे त्यांच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

सामन्याच्या २६व्या मिनिटाला येक्सी जॅरक्विनने आंद्रेस गोमेझच्या पासवर कोस्टा रिकाचे खाते उघडले. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. आणखी चारच मिनिटांनी गिनी संघाच्या फँडजे टॉरेने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात हीच बरोबरी कायम होती. उत्तरार्धात सामन्याच्या ६७व्या मिनिटाला आंद्रेस गोमेझने गोल केला व संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बराच वेळ त्यांनी ही आघाडी टिकवली होती. गिनी संघाच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर ८१व्या मिनिटाला त्यांच्या इब्राहिमला लय सापडली. त्याने अप्रतिम फटका मारला व संघाचा दुसरा गोल केला.

दणदणीत विजयासह स्पेनचे आव्हान कायम

‘युरोपियन फुटबॉलमधील महाशक्ती’ म्हणून ख्याती मिळवलेल्या स्पेन संघाने मंगळवारी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ केला. स्पेनने नायजर संघाचा ४-० असा धुव्वा उडवत कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पहिला विजय नोंदवला आणि दुसऱ्या फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम राखल्या. अ‍ॅबेल रुईझने दोन गोल करीत त्यांच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत स्पेन संघाने पूर्वार्धातच ३-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.

उत्तर कोरियाला नमवत ब्राझील बाद फेरीत

बचावासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाला ब्राझीलने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत २-० अशा फरकाने सहज नमवत बाद फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील ब्राझीलचा हा सलग दुसरा विजय ठरला. दुसरीकडे कोरियाचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या सत्रात ब्राझीलच्या आक्रमणाला धार चढल्याचे पाहायला मिळाले. ब्राझीलकडून लिंकोनने ५६ व्या आणि पॉलिन्होने ६१ व्या मिनिटाला गोल केले.