सोमदेव, साकेत उपांत्यपूर्व फेरीत
ट्रॅरलगॉन, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत युकी भांब्रीने उपांत्य फेरीत आगेकूच केली. दुसरीकडे चालरेट्सव्हिले, अमेरिका येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सोमदेव देववर्मन आणि साकेत मायनेनी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. आठव्या मानांकित युकीने चौथ्या मानांकित जपानच्या तात्सुमा इटोवर ६-४, १-६, ७-५ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत २७७व्या स्थानी असलेल्या युकीने गेल्यावर्षी तात्सुमाविरुद्धच्या पराभवाची परतफेड केली. गेल्यावर्षी क्योटो चॅलेंजर स्पर्धेत तात्सुमाने युकीला नमवले होते. तात्सुमा युकीपेक्षा १०५ स्थानांनी पुढे आहे. उपांत्य फेरीत युकीचा मुकाबला जागतिक क्रमवारीत १३८व्या स्थानी असलेल्या जेम्स डर्कवर्थशी होणार आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत द्वितीय मानांकित सोमदेवने युक्रेनच्या डेनिस मोलचानोव्हचा ६-२, ६-३ असा पराभव केला. पुढील फेरीत त्याचा मुकाबला सातव्या मानांकित अमेरिकेच्या ऱ्हायन विलियम्सशी होणार आहे.
साकेत मायनेनीने अमेरिकेच्या चेस बुकॅननचा ६-४, ६-४ असा पराभव केला. पुढच्या फेरीत त्याची लढत कॅनडाच्या जेसी लेव्हिनशी होणार आहे. दुहेरीत सोमदेव-सनम सिंग जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
द्वितीय मानांकित अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅयजेक-टय़ानिस सँडग्रेन जोडीने सोमदेव-सनमवर ६-४, ६-२ असा विजय मिळवला.