दम्बुल्लाच्या मैदानावर झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९ गडी राखत मात केली. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम लंकेला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पहिल्या सामन्यात लंकेच्या फलंदाजांनी आपल्या डावाची चांगली सुरुवातही केली होती. आघाडीच्या फळीने श्रीलंकेची धावसंख्या शंभरीपार नेल्यानंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे लंकेचा संघ २१६ धावांमध्ये गारद झाला होता.

सामन्याच्या ३४ व्या षटकात दुसऱ्या चेंडुवर श्रीलंकेची पाचवी विकेट पडली होती. चमार कपुगेदरा धावबाद होऊन माघारी परतला होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीने चपळाई दाखवून केलेल्या अचूक फेकीवर कपुगेदरा बाद झाला होता. सामन्याच्या एक दिवस आधी कपुगेदराने विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला आपलं ‘सेलिब्रेटी क्रश’ म्हणलं होतं. यावेळी विराटने कपुगेदराला धावबाद करत बदला घेतल्याचं बोललं जातं आहे.

अवश्य वाचा – विराटनंतर श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू अनुष्का शर्माच्या प्रेमात

भारताकडून गोलंदाजीमध्ये अक्षर पटेलने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. तर केदार जाधव, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आगामी चार वन-डे सामने आणि एका टी-२० सामन्याततरी श्रीलंकेचा संघ भारतीय संघाचा आव्हान देतो का हे पहावं लागणार आहे.