ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मास्टर – ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीय संघाच्या आणि कर्णधार विराट कोहलीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. पुणे कसोटीत पराभव झाला असला तरी, भारतीय संघ दणक्यात पुनरागमन करेल, असा विश्वास सचिनने व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ३३३ धावांनी पराभव करून विराटच्या नेतृत्वाखाली संघाचा विजयरथ रोखला होता.

दिल्लीत मॅरेथॉनला सचिन तेंडुलकरने हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने भारतीय संघाचे समर्थन केले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चित्र अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याविषयी म्हणाल तर, भारतासाठी हा आव्हानात्मक कसोटी सामना होता. हा एक खेळाचाच भाग आहे. पहिल्या कसोटीत पराभव झाला म्हणजे मालिका गमावली असा त्याचा अर्थ होत नाही. या मलिकेचे पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे सचिन तेंडुलकर म्हणाला. भारतीय संघाच्या खेळाविषयी मला माहिती आहे. ते नक्कीच दमदार पुनरागमन करतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही तसेच काहीसे आहे. ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पुनरागमन करू, असा विश्वास त्यांनाही असतो. त्याचप्रमाणे भारतीय संघही पुनरागमन करेल, याची मला खात्री आहे. भारतीय संघ जोरदार कमबॅक करेल आणि ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

प्रत्येक संघ आणि खेळांडूना त्यांच्या कारकिर्दीत चढउतार पाहायला मिळतात. त्यामुळेच खेळ आणखी रोमांचकारी होतो. प्रत्येक संघाची आणि खेळाडूंची चांगली वेळही येते आणि कठिण वेळ येते. पण त्यातून सावरून प्रतिस्पर्ध्यांसमोर कशा प्रकारे आव्हान निर्माण केला जातो, यावर बरेच काही अवलंबून असते, असेही तो म्हणाला. यावेळी त्याने मॅरेथॉनविषयी मत व्यक्त केले. मॅरेथॉनमुळे अधिकाधिक लोकांना जोडले जात आहे, ही सकारात्मक बाजू आहे. अधिकाधिक लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे चांगले आरोग्य लाभत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या दिल्लीतील लोकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे, असेही तो म्हणाला.