गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपल्या खोचक शैलीत रेल्वेला टोला लगावला आहे. आतापर्यंत गाड्या वेळेवर येत नाहीत, हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, आता ट्रेन्सला रूळावर राहणेही अवघड जाऊ लागले आहे, असे ट्विट सेहवागने केले. या अपघातांची जबाबदारी कुणीच स्विकारत नाही. निदान भविष्यात तरी मानवी जीवनाचे मोल संबंधितांना कळेल, एवढीच आशा करतो, असेही वीरूने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील वाढत्या दुर्घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तीन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या खतौली येथे कलिंगा उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळांवरून घसरून भीषण अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला होता तर १२ लोक जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे औरेया जिल्ह्यात आणखी एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत डंपरला धडकल्यामुळे कैफियत एक्स्प्रेसचे इंजिन आणि दहा डबे रूळावरून खाली घसरले. यामध्ये तब्बल ७४ प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर सध्या नजीकच्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) काही वेळापूर्वीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एव्हाना मदतकार्याला सुरूवात केली आहे.

आझमगढ ते नवी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात हा डंपरला धडकल्यामुळे झाला. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग काढून टाकणे आणि मानवविरहीत फाटक अशा उपाययोजनांची देशभरात अंमलबजावणी केल्याचा दावा वारंवार रेल्वे खात्याकडून केला जातो. मात्र, तरीही हा डंपर कैफियत एक्स्प्रेसच्या मार्गात आलाच कसा, अशी शंकाही या अपघातामुळे निर्माण झाली आहे.