वर्गात तुम्हाला कधी उभे राहण्याची शिक्षा करण्यात आलीय? अशी शिक्षा तुम्हाला शिक्षकांनी दिली असेल तर तुम्ही त्यांचे आभारच मानायला पाहिजेत. कारण यामुळे तुमच वजन कमी होण्यात मदतच झाली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी याचा शोध लावला आहे. परदेशात ‘स्टॅण्डिंग डेस्क’ म्हणजेच उभे राहून वापरायची बाके वापरली जातात. भारतात जरी अशी बाके वापरली जात नसली तरी येथे शाळेत उभे राहण्याची शिक्षा केली जाते.

अशा प्रकारे उभे राहून अभ्यास करणे आणि कोणतीही कामे करणे आरोग्यासाठी उत्तम आहे, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळे वजनही कमी होते. शाळेत अगदी मुलांनीच नाही तर शिक्षकांनीही उभ्याने वापरता येणाऱ्या बाकांचा उपयोग केला पाहिजे. यामुळे त्यांचे अभ्यासात लक्ष लागते, शैक्षणिक विकास होतो आणि शिक्षकांना वर्गात विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यास फायदा होतो. यासाठी त्यांनी प्रत्येक शाळेतील चार वर्गाची निवड केली. दोन वर्गाना उभे राहण्याची बाके दिली तर दोन वर्गाना बसण्याची बाके दिली. उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वजन हे जास्त कमी झाल्याचे लक्षात आले होते. अशा प्रकारच्या बाकांमुळे विद्यार्थी त्यांना हवी तशी हालचाल करू शकत होते. इकडे-तिकडे जाऊ शकत होते. याउलट बसणाऱ्या मुलांना पूर्णवेळ एकाच जागी बसून राहावे लागत होते.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)