ज्या माता लठ्ठ असतात व जास्त मेद व साखरयुक्त आहार घेतात त्यांच्यामुळे पुढील तीन पिढय़ांपर्यंत लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. माता जर लठ्ठ असतील, जास्त मेद घेत असतील तर पुढील तीन पिढय़ांत चयापचयावर त्याचा परिणाम दिसतो, मग मुलांनी आरोग्यदायी आहार घेतला तरी त्याचा काही परिणाम होत नाही, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. इतर अभ्यासात स्त्रियांच्या बाळंतपणातील प्रकृतीचा संबंध बाळाच्या वजनाशी जोडण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठात उंदरांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, गर्भवती होण्याच्या अगोदर जनुकीय अनियमिततांमुळे लठ्ठपणा मुलींमध्ये उतरतो व तो पुढच्या पिढीत चालत राहतो. त्यामुळे टाइप दोन मधुमेह व हृदयविकाराची शक्यता वाढते. आमच्या निरीक्षणानुसार आई जर लठ्ठ असेल तर पुढील अनेक पिढय़ांत मुलांमध्ये सुधारणा होत नाही असे वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्रा. केली मोले यांनी सांगितले. आईचा लठ्ठपणा हा चयापचयाशी निगडित असतो व तो फलन न झालेल्या अंडय़ातील मायटोकाँड्रियल डीएनएमधून पुढील पिढय़ात उतरतो. मायटोकाँड्रिया हे पेशींचे ऊर्जा केंद्र असते कारण चयापचयासाठी ऊर्जा त्यातून पुरवली जाते. पेशींमध्ये वेगळी जनुके असतात; त्यात अनेक गोष्टी आईकडून आलेल्या असतात. उंदरांवरील प्रयोगात मुलींच्या तीन पिढय़ांमध्ये सदोष मायटोकाँड्रिया जातात. आईच्या ओसाइट्स म्हणजे अफलित अंडय़ातून सदोष मायटोकाँड्रिया जातात. या उंदरांना ६० टक्के मेद व २० टक्के साखर असे पाश्चिमात्य गणितावर आधारित अन्न दिले असता किंवा चांगले सकस अन्न दिले तरी त्यांच्यात लठ्ठपणा वाढत गेला. त्यांच्यात इन्शुलिनला प्रतिरोध वाढून चयापचयाच्या समस्या निर्माण झाल्या. माणसात मुलांचे अन्न हे आईवडिलांसारखेच असते, त्यामुळे मातेच्या चयापचय दोषाचा संबंध मुलांमध्ये असतो. ‘सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)