भारतातील हवा प्रदूषणामुळे बहुतांश भारतीयांचे आयुष्य तीन वर्षांनी कमी होते असे एका नवीन अभ्यासाअंती सांगण्यात आले. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा हे दिल्ली दौऱ्यावर आल्याने त्यांचे आयुष्य तेथील प्रदूषणामुळे आठ तासांनी कमी झाल्याचे वृत्त यापूर्वी देण्यात आले होते.
भारतातील निम्मी लोकसंख्या म्हणजे ६६ कोटी लोक हे जास्त हवा प्रदूषण असलेल्या भागात राहतात. भारतात हवा प्रदूषणाचे जे निकष सुरक्षित मानले जातात त्यापेक्षा हे प्रदूषण जास्त आहे असे शिकागो, हार्वर्ड व येल विद्यापीठाच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित शोधनिबंध इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
 भारतात हवा प्रदूषणाची स्थिती बदलता आली तर तेथील लोकांचे आयुष्य ३.२ वर्षांनी वाढू शकेल असे मत या अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे. भारतातील निकषांचे पालन केले तर २.१ अब्ज लोकांचे आयुर्मान वाढेल असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, भारताचा भर हा प्रगतीवर आहे पण बराच काळ विकासाची पारंपरिक व्याख्या बाजूला ठेवून हा विकास चालू आहे त्यामुळे हवा प्रदूषणासारख्या समस्यांनी नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे, असे शोधनिबंधाचे लेखक व शिकागो विद्यापीठाचे ऊर्जा धोरण अभ्यास विषयाचे संचालक मायकेल ग्रीनस्टोन यांनी म्हटले आहे.  
हवा प्रदूषणामुळे लोक अकाली मरतात व आमच्या अभ्यासानुसार कामाच्या ठिकाणची उत्पादनक्षमता घटते व आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, आरोग्यावरचा खर्च वाढत जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरात भारतातील १३ शहरे आहेत. त्यात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली हे आहे.  
श्वासनलिकेच्या विकारांनी मरणाऱ्यांचे प्रमाण भारतात अधिक आहे. हवा प्रदूषणामुळे २ अब्ज जीवन वर्षे इतकी किंमत मोजावी लागते असे  हार्वर्ड केनेडी स्कूलच्या एव्हिडन्स फॉर पॉलिसी डिझाइन या विभागाच्या संचालक व सहलेखिका रोहिणी पांडे यांनी या शोधनिबंधात म्हटले आहे. लाखो भारतीय नागरिकांचे आयुष्य निरोगी राहावे व आरोग्यवान राहावे त्यामुळे आर्थिक विकासातही आपोआप वाढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. येल विद्यापीठाचे निकोलस रायन, हार्वर्डचे अनिश सुगाथन व जान्हवी नीलेकणी व एपिक इंडियाचे अनंत सुदर्शन यांनीही या शोधनिबंधात सहलेखन केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, प्रदूषण कमी करणे असे अनेक उपाय त्यांनी सुचवले आहेत.