वसंत आबाजी डहाके हे कवी, कादंबरीकार, चित्रकार, समीक्षक, कोशकार अशा विविधांगांनी परिचित आहेत. साहित्याबरोबरच इतर ललित कलांविषयी त्यांना सजग भान आहे. सर्वच कला प्रकारांकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक दृष्टी आहे. ती त्यांच्या लेखनामधून सतत प्रतीत होत आलेली आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘काव्यप्रतीती’ या नव्या पुस्तकातूनही ती व्यक्त होते.  डहाके म्हणतात, कविता हा त्यांचा ध्यास आहे.
डहाके यांनी ‘योगभ्रष्ट’पासून अनुसरलेली कवितेची वाट जीवनातील अनुभवांचा लयबद्ध आविष्कार करीत राहिली आहे. त्यांनी कवी म्हणून एक अस्सल कविता लिहिली. त्याचप्रमाणे कवितेचे व्यासंगी अभ्यासक म्हणून कवितेच्या स्वरूपाची, तिच्या रूपबंधाची, प्रयोगस्थळांची आणि प्रवृत्ती-प्रवाहाची ओळख त्यांनी मराठी वाचकांना मनस्वीपणे करून दिली. पूर्वीचे ‘कवितेविषयी’ आणि नवे ‘काव्यप्रतीती’ अशी दोन्ही पुस्तके याची साक्ष आहेत. कवितेच्या आकलनासाठी मराठी समीक्षेत या पुस्तकांची भर मौलिक अशीच आहे.
‘काव्यप्रतीती’ हे मराठी कवितेचा समृद्ध अनुभव देणारे पुस्तक आहे. साहित्याची वाटचाल पाहता, कोणत्याही साहित्य प्रकाराची संरचना स्थिर दिसत नाही. ती काळानुरूप बदलते. या रचनाबंधाच्या बदलामागे काही निश्चित कारणे असतात. त्यासाठी संरचना बदलणाऱ्या साहित्यकृतींचा समकाल अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. कवितेच्या संदर्भाने हा बदल अभ्यासणे खूपच उद्बोधक आहे. कविता हा मूलत:च लवचीकपणा धारण केलेला साहित्य प्रकार आहे. त्यामुळे साहित्य प्रकार म्हणून कवितेची ओळख करून घेताना अनेक प्रश्न उभे राहतात. एखाद्याने केलेल्या विधानाला छेद देईल असा दुसरा पर्याय कवितेत तयार असतो. त्यामुळे कवितेने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत सतत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याची चर्चा या पुस्तकाच्या सुरुवातीला येते.
कोणत्याही साहित्य प्रकाराच्या सीमा बंदिस्त नसतात. त्यातूनच साहित्य प्रकारविशिष्ट संदिग्धता निर्माण होते. ती दूर करण्याच्या हेतूने वाङ्मयाचे व्यवस्थापन करणाऱ्या निर्धारक घटकांचा विचार डहाके यांनी प्रारंभीच्या दीर्घ प्रकरणात केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी आहे. अर्थात कवितेचा रूपशोध घेणारी ही चर्चा नवी नाही. रमेश तेंडुलकर, सुधीर रसाळ, म. सु. पाटील, वसंत पाटणकर अशी एक समृद्ध परंपरा या संदर्भात सांगता येईल. या पूर्वसुरींच्या मत-मतांतरांचा आधार घेत केलेली ही चर्चा कवितेची सद्धांतिक चर्चा वृिद्धगत करणारी आहे.
आदिबंध, मिथक (प्राक्कथा), रूपक, प्रतिमा, प्रतीके ही कवितेची अभिन्न अंगे आहेत. आशयाला रूप देणारी भाषा ही काव्यचच्रेतील महत्त्वाचा घटक असते. कवितेची निश्चित अशी वेगळी भाषा नसते. कवीची व्यवहारभाषाच कवितेत अर्थाच्या अनेक मिती निनादत ठेवते. ती कवितेला एक रूप प्राप्त करून देते. कवितेच्या भाषेचे अर्थ कोशांमध्ये शोधून सापडत नाहीत. या भाषेला मानवी अनुभवांचा, इतिहासाचा संदर्भ असतो. डहाके म्हणतात, ‘कवितेतून भाषेच्या विविध शक्यतांचा आणि भाषेच्या माध्यमातून वास्तवाच्या पुष्कळतेचा शोध घेतला जात असतो. या दोन्ही गोष्टींमुळे प्रयोगशीलता संभवते.’ कवितेच्या भाषेचा, आदिबंध, मिथ, प्रतिमा-प्रतीके या संदर्भाने येणारा डहाकेंचा हा मूलगामी विचार मराठी काव्यचच्रेला एक परिमाण प्राप्त करून देणारा आहे.
कवितेच्या भाषेची ही चर्चा करताना, या भाषेची एक तुलना ते चित्राच्या भाषेशी करतात. डहाके स्वत: एक चित्रकार असल्याने त्यांना काव्यभाषेबरोबरच रंगरेषांची भाषादेखील अवगत आहे. डहाकेंनी ठिकठिकाणी चित्रार्थाविषयी केलेली चर्चा काव्यार्थाच्या संदर्भानेच येत असल्याने ती त्यांच्या काव्यचच्रेत भरच टाकते. काव्यचच्रेत काव्यार्थाची निष्पत्ती होणाऱ्या सर्वच घटकांची चर्चा अपेक्षित आहे. शिवाय कवितेच्या आकलनासाठी वाचकाने कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या संदर्भानेही डहाके काही मुद्दे समोर ठेवतात.
एक साहित्य प्रकार म्हणून कवितेचा मराठी कवितेच्या परिप्रेक्ष्यात विचार केल्यानंतर मर्ढेकरांची कविता आणि मर्ढेकरोत्तर नवकवितेच्या वाटचालीतील महत्त्वाच्या कवितेची चर्चा यात आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील सहा-सात प्रकरणे खर्ची टाकली आहेत. ही चर्चा मर्ढेकरोत्तर नवकवितेची वाटचाल सांगताना तिच्यातील महत्त्वाची स्थळे, प्रयोगशीलता या संदर्भाने काही मुद्दय़ांना स्पर्श करते.  
बा. सी. मर्ढेकर यांच्यावर मराठीत विपुल समीक्षणात्मक लेखन झाले आहे. डहाके म्हणतात, ‘मर्ढेकरांच्या कवितेच्या आकलनासंदर्भात मराठी समीक्षेत गोंधळ दिसतो. मर्ढेकरांच्या कवितेला असलेले समकालीन जागतिक संदर्भ आणि त्यांचे इंग्रजी कवींशी चाललेले समांतर असे लेखन त्यांची कविता समजून घेताना विचारात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर औद्योगिक विकास, नागरीकरण या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या साहित्याच्या संदर्भात विचारात घेतली जाणारी आधुनिकतावाद ही संकल्पना मर्ढेकरांच्या कवितेसंदर्भात विचारात घेतली पाहिजे.’ त्याचा शोध डहाके येथे घेतात.
गेल्या संपूर्ण शतकाचा साक्षीदार असणारा कवी म्हणून ते कुसुमाग्रजांच्या कवितेचा विचार करतात. तर  िवदांच्या मुक्तछंदाची चर्चा करताना त्यांच्यापूर्वी मुक्तछंदाच्या बाबतीत नव्या वाटा शरच्चंद्र मुक्तिबोधांनी शोधल्याचेही ते आवर्जून नोंदवतात.
साठोत्तरी मराठी कवितेत ना. धों. महानोर, नामदेव ढसाळ ही महत्त्वाची नावे. त्यांच्या कवितेविषयीही डहाके यांनी लिहिले आहे. त्यानंतर ७०-८० या दशकाची कविता म्हणून ते नारायण कुलकर्णी-कवठेकरांची कविता कसे राजकीय भान स्पष्ट करते, समकालाविषयी रोखठोक बोलणे, वास्तव भेदकपणे समोर ठेवणे हे त्यांच्या राजकीय भानाचे द्योतक असल्याचे ते नोंदवतात.
या पुस्तकातील अनेक लेख प्रसंगोपात्त लिहिलेले असावेत. त्यामुळे या कालखंडातील स्वतंत्रपणे दखल घ्यावेत असे सुर्वे, कोल्हटकर, चित्रे, नेमाडे, तुलसी परब, गुरुनाथ धुरी, काळसेकर यांच्यासारखे काही कवी लेखकाच्या चच्रेतून सुटलेले दिसतात. पुढे लघुअनियतकालिकांच्या चळवळीत यापकी अनेकांचे उल्लेख येतात, पण ते पुरेसे वाटत नाहीत. मराठी कवितेच्या वाटचालीत अनियतकालिकांचे योगदान मोठे आहे. या संदर्भाने एक महत्त्वाचा लेख या पुस्तकात आहे. साठोत्तरी मराठी कवितेतील सर्वच महत्त्वाचे कवी या चळवळीतून पुढे आले. त्यामुळे डहाके म्हणतात, त्याप्रमाणे मराठी कवितेचा समग्र शोध या चळवळीतून सुरू झालेल्या लघुनियतकालिकांचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होणार नाही.
साठोत्तरी कवितेतील अजून एक महत्त्वाची कविता दलित चळवळीतून पुढे आलेली आहे. या चळवळीवर स्वत:ची नाममुद्रा उमटवलेले अनेक महत्त्वाचे कवी, या चळवळीच्या गाभ्याशी असणारे प्रश्न आणि या कवितेचे सुर्वे, कोल्हटकर, तुलसी परब इत्यादींच्या कवितेशी असणारे नाते डहाके अनेक उदाहरणांनी स्पष्ट करतात. मराठी कवितेत अलीकडच्या काही वर्षांत कवयित्रींनी लक्षणीय स्वरूपाची कविता लिहिली आहे. ‘आजच्या कवयित्री’ या लेखात त्याची डहाके यांनी दखल घेतली आहे. मात्र या चच्रेला त्यांनी प्रभा गणोरकर ते राही डहाके असा कौटुंबिक संदर्भ दिल्याने ही चर्चा थोडी आत्मकेंद्री वाटते.
डहाकेंनी या पुस्तकातील चच्रेचा शेवट ‘काव्यपर्व’ या निरंजन उजगरे यांनी अनुवादित व संपादित केलेल्या काव्यसंग्रहाची दखल घेऊन केला आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील हा संग्रह म्हणजे एक ऐतिहासिक घटना आहे, असे ते म्हणतात.

काव्यप्रतीतीतून व्यक्त होणारी डहाकेंची स्वागतशील वृत्ती आणि आशावाद महत्त्वाचा आहे. आज कविता चांगली आणि खूप लिहिली जाते आहे. विशेषत: नव्वदनंतर नवी संवेदना घेऊन लिहिते झालेले अनेक कवी मराठी कविता समृद्ध करताना दिसतात. त्याचे डहाके स्वागत करतात.
काव्यचर्चा म्हणून हे पुस्तक उल्लेखनीय वाटत असताना, पुस्तकाची निर्मिती मात्र खटकणारी आहे. पानोपानी आढळणारे मुद्रणदोष, सामान्य दर्जाची छपाई, तेवढय़ाच सामान्य दर्जाचा कागद आणि बाइंडिंग, विवेक रानडे यांचे मुखपृष्ठ कल्पक आणि सुबक असूनही ते सामान्य दर्जाच्या कागदावर छापले आहे. पुस्तकातला ऐवज आणि डहाकेंचे या क्षेत्रातील स्थान लक्षात न घेता केलेली पुस्तकाची सामान्य निर्मिती पुस्तक वाचताना खटकत राहते.
‘काव्यप्रतीती’ – वसंत आबाजी डहाके,
विजय प्रकाशन, नागपूर,
पृष्ठे – २५४, मूल्य – ३५० रुपये.