चतुरस्र साहित्यिक आणि छांदिष्ट व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गो. नी. दांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांरंभाचे औचित्य साधून त्यांच्या कन्येनं उलगडलेले ‘गोनीदा’!
आमच्या तळेगावच्या लहानशा घरात मोजक्या काही संसारी वस्तूंबरोबर खूप पुस्तकं, आप्पांनी जमवलेल्या काही ऐतिहासिक, काही निसर्गाचे चमत्कार दाखवणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा वस्तू, त्यांनी काढलेले शेकडो फोटो यांचं महत्त्वाचं स्थान असायचंच; पण आप्पांच्या दृष्टीनं आणखी एक खूप महत्त्वाची वस्तू तिथे महत्त्वाचं स्थान पटकावून होती. ती वस्तू म्हणजे रेडिओ. त्यावर लागणारे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे, भावसंगीत, भक्तिसंगीत आणि लोकसंगीताचे कार्यक्रम आप्पा अगदी आवर्जून ऐकत असत. आणि त्याबरोबर दिवसभरात लागतील तेवढय़ा सर्व बातम्या.
मी पाच-सात वर्षांची असल्यापासून मला पहिली जाग यायची ती पुणे केंद्रावर लागलेल्या एखाद्या भक्तिगीतानं. रेडिओचा आवाज फार मोठा नसायचा; पण आमचं घर छोटं, त्यामुळे तो उशाशीच असायचा जवळजवळ. थोडी जाग, थोडी पुन्हा झोप.. पण कानावर ती गीतं पडत असायची. दिवसभर एकीकडे लिहीत असलेले आप्पा गाणं ऐकत असायचे. लेखनात तंद्री आणि कानांवर सूर.
त्यांनी स्वत: गायलेलं गाणं मी ऐकलं, ते रायगडावरती. त्यावेळी तिथे राहायला एक पत्र्याची शेड होती. आम्ही सगळे दहा-पंधराजण तिथेच मुक्कामाला होतो. दिवसभर गडावर भटकून पाय खूप दमले होते. झोप गाढ लागली होती. भल्या पहाटे ऐकू आलं..
‘एक तत्त्व नाम दृढ धरि मना
हरिसी करुणा येईल तुझी’
आप्पा माझ्या शेजारी अंथरुणावर बसून, अंगावर शाल पांघरून गात होते. ते गात आहेत याचं आश्चर्य तर वाटलंच; पण क्षणभर रागही आला. वेळ अगदी पहाटेची होती. मला आणि सगळ्यांनाच झोपायचं होतं. पण एकीकडे ते गाणं ऐकायला छानही वाटत होतं. त्या अभंगानं जागं करून त्यांनी सगळ्यांना उठवलं आणि आम्हाला गडावरून दिसणारा सूर्योदय पाहायला नेलं. जाताना मी त्यांना विचारलं, ‘आप्पा मी तर आज तुमचं गाणं पहिल्यांदा ऐकलं. कुठे शिकलात का तुम्ही हे?’ तर म्हणाले, ‘अगं, मी लहानपणी आळंदीला वारकरी शिक्षणसंस्थेत होतो. तिथे असे खूप अभंग शिकलो. वारकऱ्यांना सहज शिकता येतील अशा सोप्या चाली असत, म्हणून मला येतं म्हणता. खरं सांगू बाळा, इतकं शांत वातावरण असलं ना भवताली, की मला ते सगळं आठवत राहतं. मग गुणगुणतो.’
पुढे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत किल्ल्यांवर राहायला जायचा परिपाठच झाला. रायगड, सिंहगड, राजगड. एकदा राजगडावर पद्मावती मंदिरासमोरच्या दीपमाळेशी बसलो होतो. तिन्हीसांजेची वेळ होती. आप्पा एक गीत गुणगुणू लागले. आम्ही सारे स्तब्ध झालो. मी पहिल्यांदाच ऐकत होते.
‘तीन प्रहर रात्र झाली, ऋषि आले भोजना
निद्रिस्त आम्ही होतो, त्यांनी केली गर्जना
गोविंदा, माधवा रे, श्रीकृष्णा यादवा रे
येई रे धावुनिया मधुसूदना केशवा..’
अगदी साधी-सोपी चाल. कोणालाही सहज गुणगुणता यावी अशी. माझ्या मनात आलं, हे कधी कानावर पडलं असेल यांच्या? अगदी पोटातून ओठात यावं, इतक्या सहजतेनं ते कसं म्हणू शकतात! असंही मनात आलं, की देशाला स्वातंत्र्य मिळवायच्या संगरात सामील होण्यासाठी ते वयाच्या तेराव्या वर्षी घरातून पळाले. त्यापूर्वी त्यांच्या मोठय़ा बहिणीनं- माईनं तिच्या मैत्रिणीबरोबर कधी फेर घातला असेल, अन् सखीच्या हातात दिलेल्या हातानं खाली झुकत हलका झोका घेतला असेल, त्यावेळी आप्पांनी हे स्त्रीगीत ऐकलं असणार. अन् ते मनात पक्कं रुतून बसलं असणार. म्हणूनच तो स्त्रीच्या मनातल्या धाव्याचा हळुवारपणा आम्हालाही ऐकताना जाणवला.lr20
‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फाकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळले
न वर्णवे तेथिची शोभा’
हा अभंग तर त्यांच्याकडून आम्ही कित्येकदा ऐकला. ज्ञानोबावर त्यांचं कमालीचं प्रेम. हा अभंग गाताना तो स्नेह शब्द-स्वरांमधून पाझरत राहायचा. सूर-तालाचे संस्कार संस्थेत झालेच होते. तिथं टाळ-मृदुंगाची साथ असेल. उत्कटता हा आप्पांच्या मनाचा धर्म असा अभंग गाताना फुलून येई. पुढे एकदा हा अभंग त्यांचे स्नेही हृदयनाथ मंगेशकरांनी ऐकला आणि आप्पांच्या वारकरी संप्रदायाच्या चालीवर सुंदर अलंकार चढवून आशाताईंच्या चैतन्यमय स्वरात तो ध्वनिमुद्रित केला.
संतांच्या विरहिण्या हा त्यांचा खास आवडीचा विषय.
‘घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का..’
ही अप्रतिम विरहिणीही अनेकदा म्हणायचे. विरहिणीतलं आर्त त्यांच्या सहज म्हणण्यातूनही प्रकट व्हायचं. ही विरहिणीही लताबाईंनी अप्रतिम म्हटली. पण मला मात्र आप्पांच्या म्हणण्यातला तो वारकरी बाज आणि भक्तिभाव सतत आठवतो.
संतरचना जशा त्यांच्याकडून ऐकता आल्या, तसं काही लोकसंगीतही. त्यांच्या भटकंतीच्या काळात आदिवासी, धनगरी, वंजारी अशा वनवासींच्या संगतीत ते राहिले. त्यांच्याही चार-दोन ओळी ते गुणगुणायचे. पण पुढे त्यांनी काही लोकगीतं लिहिली. मला असं आठवतंय, की पुण्यातल्या अहिल्यादेवी हायस्कूलच्या मुलींना लोकनृत्य स्पर्धेत सादर करण्यासाठी त्यांनी ती लिहिली होती. लोकभाषा, लोकसंगीताचा ढंग, त्याचा ताल- सगळ्याला अस्सल बाज होता. त्या शाळेत ते बसवलं जायचं तेव्हाही आप्पा मार्गदर्शनासाठी तिथे जायचे. आणि त्या मुली स्पर्धा जिंकायच्याच. नंतर आमच्या तळेगावच्या शाळेत आप्पा आम्हाला ती गीतं शिकवायचे. भंडारदरा धरणाच्या जवळच्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या ठाकरवाडीत ते काही दिवस राहिले होते. तिथल्या आदिवासींचं जोशीलं नृत्य त्यांनी अनेकदा अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांनी गीत रचलं..
‘भलरं गडी ठाकरगडी, कळसूबाई आमची आई
आमच्या नाचामंदी रं कांबळ नाचामंदी रं
घाम गळतो भुई रं अन् नाचाची टिप्पर घाई रं’
गीत छान म्हणायचे आप्पा. आवाज सुरेल होता. उच्चार स्वच्छ होते. ठाकरी ढंग परिचित होता. अन् ठाकरी शैलीत पावलं टाकून नृत्य कसं करायचं, हे माहीत होतं त्यांना. मला तर शिकवायचेच ते; पण शाळेत येऊनही काही वेळा आम्हाला करून दाखवायचे.
‘धनगर राजा वसाड गावाचाऽ
येळकोट गातो मल्हारी द्येवाचाऽ
वसाड गावाचा धनगर राजा
रानावनामंदी मेंढरं पाळी
मेंढरं पाळी हो मेंढरं पाळी
त्यांच्यासाठी तो रानीवनीच्या
काटेरी कुटेरी बाभळी ढाळी।। १॥’
हेही गीत त्यांनी रचलं होतं. धनगरांच्या नृत्याची लय पकडलेलं. खास धनगरी शैलीतले ‘उईऽऽ’सारखे ध्वनीही त्यात योजले होते.
एक वंजारीगीतही ते म्हणायचे. स्वत:चंच.
‘ऐका वंजाऱ्याच्या लग्नाची कथा हुंबा होरे हुंबा हो’
ही लग्नकथाही छान म्हणून दाखवायचे ते. वंजारी जमातीची शिवशंकरावरची श्रद्धा अन् लग्नसमारंभात प्रकट होणारं त्याचं रूप. वंजाऱ्यांचं शौर्य, त्यांच्या शिकारीतल्या गमती हे सगळं त्या गीतात होतं. संवादातून एक छोटा प्रसंगही त्या गीतात उभा केला होता. त्यातलं नाटय़ अगदी रंगवून म्हणायचे. भवताली कोणी लहान मुलं जमली की आप्पांना ती म्हणायची स्फूर्ती यायची. पाठोपाठ टाळ्यांच्या साथीनं मुलं. त्याची झिंग वेगळीच असायची. आज सत्तरीच्या आसपास असलेल्या कित्येकजणी शाळा-कॉलेजात आप्पांच्या या गीतांवर नाचल्या आहेत. मला त्यातल्या काहीजणी मुद्दाम भेटून आवर्जून सांगतात.
या इतिहासप्रेमी माणसाकडून पोवाडे कसे ऐकता आले नाहीत, याचं मात्र आश्चर्य वाटतं. शिवाजीमहाराजांवर त्यांचं कमालीचं प्रेम असूनही. मात्र, एक ऐतिहासिक प्रसंग हुबेहुब उभा करणारी कुसुमाग्रजांची कविता ते फार समरसून म्हणायचे-
‘वेडात मराठे वीर दौडले सात..’
ही कविता त्यांच्याकडून ऐकणं हा एक खास अनुभव होता. विषयाचं आणि प्रत्येक शब्दाचं नेमकं भान. त्यातल्या काही शब्दांवर नेमका जोर देऊन त्याचा ठसा ऐकणाऱ्यांच्या मनावर उमटवण्याची त्यांची लकब यामुळे प्रतापराव गुजरांची कथा साक्षात् डोळ्यासमोर उभी राहत असे. त्यातलं शिवाजीमहाराजांचं उपहासानं डिवचणं, प्रतापरावांचा त्वेष अन् समर्पण आप्पांच्या आविर्भावातून, जिवंत होणाऱ्या शब्दांतून, भावोत्कट स्वरातून आणि त्यांच्या मुद्राभावांतून साकार होई. त्यांच्याबरोबर किल्ल्यांवर जाणाऱ्या शेकडो सवंगडय़ांनी त्यांचे हे गीत ऐकलं आहे.
‘दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढय़ात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर दिसतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात-’
हा अंतर्मुख आणि बेचैन करणारा अनुभव त्या सवंगडय़ांनाही आला असेल. मी तर तो अनेकदा घेतला आहे.
देशभक्तीनं भारलेल्या त्यांच्या मनाचं प्रतिबिंब मला एकदा स्पष्ट दिसलं सिंधुदुर्गाच्या तटावर. आम्ही चार-पाचजण होतो. तटावर समुद्राच्या लाटांच्या साक्षीनं बसलो होतो. समोर अपार दर्या. आप्पा थोडे दूर एकटेच होते. बराच वेळ सागराकडे पाहत होते. अन् मग आपल्यातच मग्न होऊन गाऊ लागले..
‘ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला..’
ते ऐकताच आम्ही हळूच त्यांच्याजवळ सरकलो. ते म्हणत होते त्या चालीत तसं आकर्षक वाटावं असं फार काही नव्हतं. कडव्यांच्या चालीतही विविधता नव्हती. पण या सर्वावर मात करत होता त्यांचा हृदयस्थ भाव. जन्मभूमीपासून दुरावलेल्या अन् तिला भेटायला आतुर झालेल्या कवीचं ते मनोगत आम्ही आप्पांच्या भावोत्कट स्वरातून अनुभवत होतो.
त्यांची अनेक गीतं मी स्वर-तालाच्या साथीशिवायच ऐकली. आप्पा त्यांच्या पूर्वायुष्यात कीर्तनं करत असत. प्रवचनंही. प्रवचनं मी ऐकली होती; पण कीर्तन नव्हतं ऐकलं. एकदाच ऐकायला मिळालं ते वारकरी कीर्तन होतं. आळंदीच्या देऊळवाडय़ात त्यांचे गुरू ह. भ. प. सोनोपंत दांडेकरांच्या आज्ञेवरून ते कीर्तनाला उभे होते. साथीला सूर होता. मृदंग होता. अन् दोन्ही बाजूंना उभे असलेले टाळकरी होते. मला कुतूहल होतं, पण थोडी कातरताही होती. आप्पा गातात चांगलंच. पण ती स्वर-तालाची बंधनं ते पाळू शकतील की नाही? कितीतरी वर्षांत ते असे गायले नाहीयेत. पण आश्चर्य! ते अगदी सराईत वारकऱ्यासारखे गायले. त्या कीर्तनात त्यांनी मुख्य अभंग घेतला होता- ‘दिन तैसी रजनी झाली गे माय..’ विरहिण्या हाच विषय होता. आणि ज्ञानेश्वरांचा तो विलक्षण उत्कट अभंग! ‘अवस्था’ लावून गेलेल्या त्या परमेश्वरभेटीची ओढ लागलेली ती विरहिणी. त्यातला प्रेमभाव आप्पांनी अतिशय समरसतेनं उभा केला. स्वरांतून आणि विवेचनातून. आप्पा स्वभावानं अधिक भावनाशील होते. विरहव्यथा उलगडून सांगताना प्रसंगी त्यांना भावनेचा आवेग आवरत नव्हता. कंठ भरून येत होता. पण साथीदार वारकरी त्या क्षणी त्यांचा अभंग उचलून त्यांना साथ देत होते. मला वाटतं, त्यांच्या भावनाशील स्वभावाची सोनूमामांनी साथीदारांना कल्पना दिली असावी. पण भावनेला आवर घालीत त्यांनी त्या कीर्तनात उभे केले विरहिण्यांचे वेगवेगळे मनोभाव! त्यांचं गाणंही दाद द्यावं असंच होतं. छोटे आलाप, मुरक्या हे अलंकारही ते अभंगांना चढवीत होते. तालाचं भान होतं. श्रोते त्यांच्या कीर्तनात अगदी रंगून गेले होते.
एक आठवण अगदी वेगळी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर ‘मोगरा फुलला’ या त्यांच्या कादंबरीचं अभिवाचन करत होतो तेव्हाची गोष्ट. त्यात मोजकेच अभंग होते. ते मी म्हणत असे. एक दिवस ते मला म्हणाले, ‘राजी, तो ज्ञानोबांच्या समाधीच्या प्रसंगाच्या वेळचा वासुदेव आहे ना, तो आपण दोघे म्हणू.’ त्याला सुराची साथ नसे. तालाचीही नसे. मनात षड्ज ठरवून, त्याचा थोडा हुंकार देऊन ते स्वर द्यायचे अन् मग आम्ही दोघं म्हणायचो..
‘टाळाटाळी लोपला नादऽ
अंगोअंगी मुराला छंदऽ
भोग भोगिता आटलाचि भेदऽ
ज्ञान गिळुनि गाऽऽवा
गोविंद गाऽऽवाऽ
ऐसा वासुदेव बोलतो बोऽलऽ’
कित्येकदा त्यांच्याबरोबर मी हा वासुदेव म्हटला. त्याआधी त्यांनी शिकवलेली काही स्तोत्रं म्हटली होती. ते सांगायचे, मी म्हणायची. संथाच ती! पण मला चोख म्हणता यायला लागल्यावर मग ‘चर्चा’! एक श्लोक ते, पुढला मी. फार आवडायचं त्यांना ते. तो वासुदेव हीही एका अर्थानं चर्चाच. पण समाधीप्रत शांतरसाकडे नेणारी. त्यातून येणारी काहीशी तटस्थता. त्यासाठी सूरही समजून लावायचा. त्यांना असं मला गायला बरोबर घेताना फार बरं वाटायचं. मलाही वाटायचं, जणू माझं बोट त्यांच्या हातात आहे. अनेकदा हा आनंद मी लुटला. पण मी त्याला दुरावले. पक्षाघातानं त्यांचा स्वरच लोपला. अगदी अचानक. त्यांचं बोलणं, स्वत:शी गाणं- सगळं बंद. हळूहळू बोलण्याचा प्रयत्न केला तरी सगळं एकाच स्वरात.. किती र्वष।
मात्र, त्यांच्यामुळेच हे सुरेल, भावोत्कट, अर्थगर्भ पाथेय माझ्या हातात आहे.
वीणा देव – veenadeo@yahoo.com