एचार्डी अर्थात मानव संसाधन विकास हा आता परवलीचा शब्द झाला आहे. विशेषत: उदारीकरण आणि निर्गुतवणुकीच्या धोरणांनंतर परदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या आणि हा विभाग कंपन्यांमध्येही अधिक प्रभावीपणे (किंवा कामगारांच्या दृष्टीने विचार करता अधिक जाचकपणे) सक्रिय झाला. पण १९७० च्या दशकात चित्र वेगळे होते. त्या वेळी मानसशास्त्र हा विषय अभ्यासासाठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘प्राध्यापकी’ किंवा ‘संशोधन’ हेच करिअरचे पर्याय मानले जात होते. अशा वेळी एक जोडपे मानसशास्त्रातील वेगळी वाट शोधायचे ठरवते, ती वाट विचारपूर्वक निवडते आणि त्यावरून तब्बल २५ वर्षे यशस्वीपणे वाटचाल करून दाखवते, हे विस्मयकारक आणि त्यापेक्षाही धाडसी म्हणावे लागेल. सुधीर आणि श्यामला वनारसे या दाम्पत्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. ‘ग्यानबाची एचार्डी’ हा त्यांच्या वाटचालीचा ‘मागोवापट’ आहे.
सुधीर वनारसे हे २५ वर्षांच्या या वाटचालीनंतर जग सोडून गेले, पण ही वाटचाल लोकांपर्यंत पोहोचावी, असे मुख्यत्वे श्यामलाताई आणि सुधीर असे दोघांचेही मत होते. त्यामुळे आपल्याच सहजीवनाचा पट त्यांनी एकहाती उलगडून दाखवला आहे. हा पट वाचनीय आहे यात शंकाच नाही. सत्तरीच्या दशकातील सामाजिक स्थिती, त्या वेळी पुढे येणाऱ्या युक्रांदसारख्या तरुणांच्या संघटना, ‘गरिबी हटाव’सारख्या योजनांची राजकीय पाश्र्वभूमी, प्राध्यापकांची मानसिकता, मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने अशा अनेक बाबी त्यांनी  उलगडून सांगितल्या आहेत. त्यामुळे त्या काळाचे भान येण्यास तसेच या काळात कंपन्यांच्या कामगिरीचा, त्यांच्या मालकांच्या विचारसरणीचा अंदाज येण्यास मदत होते. एखाद्या कंपनीला ‘मानसशास्त्रीय सल्ला’ द्यावयाचा म्हणजे नेमके काय करायचे, त्याचे टप्पे कोणते, कंपन्या बंद पडण्याची कारणे, त्यामागील विचारधारा, मग त्यासाठीचा अभ्यास कसा करायचा, हे श्यामलाताई सांगत जातात. त्यात सहजता आहे, ओघवती शैली आहे आणि मुख्य म्हणजे कोणताही खोटा अभिनिवेश नाही, हे जाणवते. समाजवादी आणि आदर्शवादी विचारांनी वाटचाल करणाऱ्या एका कुटुंबाची आणि त्यांच्या कंपनीची ही कहाणी वाचनीय झाली आहे.
पुणे विद्यापीठातील अनुभव, भारतातील आयटी कंपन्यांचा प्रवेश, त्यानंतर स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेले बदल, लैंगिक छळवणुकीच्या तक्रारी, मग त्यावरील उपाययोजना आणि गंमत म्हणजे स्वार्थी हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी ‘कंपन्यांच्या सामाजिक बांधीलकी’चा (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) वापर करण्याची मानवी वृत्ती यांचा सोदाहरण धांडोळा घेतला आहे.
वनारसे दाम्पत्याने कामगारांसाठी अनेक शिबिरे घेतली. एका शिबिरानंतर मालकाने ‘आता उद्यापासून हे सगळे आमचं ऐकतील ना’, असा सवाल केला. त्या वेळी ‘जिथे माझा मुलगा माझे सगळे ऐकत नाही, तिथे अधिकार असलेल्या कामगारांची हमी मी कशी देऊ, तुम्ही हे आधी सांगितले असतेत, तर तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचले असते’, असे सुधीरजींनी दिलेले उत्तर ऐंशीच्या दशकातील लोकांची एचार्डीकडे पाहण्याची मानसिकता दाखवणारे आहे.
पण या पुस्तकात दोन गोष्टी वारंवार जाणवतात, एक म्हणजे या पुस्तकाला छायाचित्रांनी उत्तम सजवता आले असते, शिवाय इतक्या अनुभवांतून तयार झालेल्या ‘मानव संसाधन विकासासाठी आवश्यक’ अशा प्रश्नांची यादी वाचकांच्या स्वयंमूल्यमापनासाठी देता आली असती. त्यामुळे या पुस्तकाचे मूल्य अधिक वाढू शकले असते. या मर्यादा सोडल्या तर, जागतिकीकरणपूर्व समाज, जागतिकीकरणादरम्यानचा समाज आणि जागतिकीकरणोत्तर समाज यांचे उत्तम समालोचन या पुस्तकात आले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
‘ग्यानबाची एचार्डी’ – श्यामला वनारसे,
सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सव्‍‌र्हिसेस, पुणे,
पृष्ठे – १३२, मूल्य – २०० रुपये.

दुरवस्था – पर्यावरणाची आणि स्त्रीची
ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांचे एका बाबीवर एकमत आहे, ते हे की पर्यावरणीय जतनाची जाणीव पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक तीव्र आणि उपजत असते. याच पाश्र्वभूमीवर पर्यावरणाशी असलेल्या स्त्रीच्या नात्याचा पट वर्षां गजेंद्रगडकर लिखित ‘स्त्री आणि पर्यावरण’ हे पुस्तक उलगडून दाखवतं.
पर्यावरणाची दुरवस्था आणि स्त्रीची दुरवस्था यांच्यात काही संबंध आहे का, या बाबी परस्परांशी निगडित आहेत का, असतील तर हे संबंध आणि या दोहोंची अवस्था कशी सुधारता येईल, याचे विवेचन वर्षां गजेंद्रगडकर यांनी केले आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ आपल्या मनातील शंकांना किंवा शक्यतांना गृहीत धरून केलेली मांडणी नव्हे तर विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या पर्यावरणविषयक शोधनिबंधांचा, आकडेवारीचा आणि निष्कर्षांचा संदर्भ अचूक आणि प्रभावीपणे नोंदवला आहे.
अशा विषयांवरील पुस्तकांची मांडणी करताना एक धोका कायम असतो. तो हा की, अशी पुस्तके केवळ समस्यांवर बोट ठेवून थांबतात. पण त्यातून उपाययोजना काहीच कळत नाहीत. सरिस्का अभयारण्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी काय करता येईल याच्या आठ शास्त्रशुद्ध पायऱ्या लेखिकेने दिल्या आहेत. स्त्री आणि भूमी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भारतीय कालगणनेनुसार विविध महिन्यांतील सण आणि त्यामागील कारणे, त्यांचा स्त्रियांशी आणि पर्यावरणाशी असलेला संबंध लेखिकेने उलगडून दाखवला आहे. सणांचे हे शास्त्रीय विवेचन वाचनीय झाले आहे. पुरेशी छायाचित्रे, उपशीर्षके, लहानलहान परिच्छेद यांच्यामुळे पुस्तकाची मांडणी ‘वाचकस्नेही’ झाली आहे.
‘स्त्री आणि पर्यावरण’ – वर्षां गजेंद्रगडकर,
प्रद्मगंधा प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १७२, मूल्य – १८० रुपये.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण