राजधानी दिल्लीविषयी अनेकांना आकर्षण असते. दिल्लीत काही काळ प्रत्यक्ष राहायला मिळालेल्या, नोकरीच्या निमित्ताने काही काळ वास्तव्य केलेल्यांना दिल्लीविषयी काहीतरी लिहावंसं वाटतं. आणि तिथे कधीही राहू न शकलेल्या, जाऊ न शकलेल्यांना दिल्लीविषयी काहीतरी जाणून घ्यावंसं वाटतं. मुघल साम्राज्याची राजधानी ते एकविसाव्या शतकातल्या भारताची राजधानी या दरम्यान दिल्लीमध्ये पाच हजारांहून अधिक वर्षांत कितीतरी स्थित्यंतरे झाली आहेत. त्याविषयी वेळोवेळी अनेकांनी लिहिलंही आहे. प्रस्तुत पुस्तक हे १९८० पासूनच्या दिल्लीविषयीचं आहे. खरं तर ही सुधारित आवृत्ती. ‘बखर राजधानीची’ या नावाने पहिली आवृत्ती १९८६ साली प्रकाशित झाली होती. आता त्यात आधीचे चार लेख आणि चार नवीन लेखांची भर घालून ही नवी आवृत्ती तयार झाली आहे. पहिला लेख इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरचं दिल्लीतलं वातावरण चित्रित करणारा आहे. दुसरा लेख बाबा आमटे यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाविषयीचा; तिसरा, शरद जोशी यांच्या आंदोलनाविषयीचा; चौथा, दिल्लीतल्या पहिल्या एशियाडविषयीचा आहे. हे चारही लेख १९८० ते १९८४ या काळात लिहिलेले आहेत. त्यानंतरचे चारही लेख २००४ साली लिहिलेले आहेत. विजय तेंडुलकर, ज्ञानेश्वर मुळे यांच्याविषयीचे दोन लेख, तर दोन लेख वैयक्तिक अनुभव सांगणारे आहेत. पण त्यात बरेच जुने संदर्भ आहेत. त्यामुळे हीसुद्धा एका अर्थाने राजधानी दिल्लीची बखरच आहे, ‘राजधानी इंद्रप्रस्थ’ असे नाव असले तरी. यातून १९८०नंतरच्या दिल्लीची काही क्षणचित्रे जाणून घेता येतात. एका मराठी माणसाच्या नजरेतून त्याने अनुभवलेली, पाहिलेली दिल्ली असे या पुस्तकाचे एकंदर स्वरूप आहे.
‘राजधानी इंद्रप्रस्थ’ – दत्तप्रसाद दाभोळकर,
महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती समारोह समिती, नवी दिल्ली,
पृष्ठे – १६५, किंमत – १७५ रुपये.

वेगळ्या लघुकथा
जपान हा आशिया खंडातला एक आधुनिक आणि पुढारलेला देश. पण तरीही त्याची संस्कृती इतर पौर्वात्य देशांपेक्षा वेगळी आहे. तशी ती राखून ठेवण्यात जपानने यश मिळवले आहे. तर अशा या जपानवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा प्रभाव पडत असताना ऱ्युनोसुके अकुतागावा या लघुकथाकाराचा उदय झाला. ‘जपानी लघुकथेचे जनक’ म्हणवल्या जाणाऱ्या अकुतागावा यांच्या निवडक अकरा लघुकथांचा हा संग्रह. १९१५ ते १९२२ या काळात लिहिलेल्या या कथा आहेत. ‘राशोमान’ ही १९१५ साली प्रकाशित झालेली कथा अकराव्या शतकात प्रकाशित झालेल्या दोन कथांवर आधारित आहे. त्यावर चित्रपटही बनवले गेले. जपानची संस्कृती, लोकव्यवहार, रूढी-परंपरा यांचं दर्शन काही प्रमाणात या कथांमधून होतं आणि अकुतागावा यांच्या लघुकथा लेखक म्हणून असलेल्या वेगळेपणाचंही.
‘राशोमोन आणि इतर जपानी कथा’ – ऱ्युनोसुके अकुतागावा, अनुवाद – निसीम बेडेकर,
मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ११९, किंमत – १२० रुपये.

हरहुन्नरी शास्त्रज्ञ
प्रसिद्धीचे वलय सदैव ज्या शास्त्रज्ञांभोवती राहिले, त्यातील पहिला शास्त्रज्ञ होता आइनस्टाइन, तर दुसरे नाव होते रिचर्ड फाइनमन. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या फाइनमन हे दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्ब निर्मितीत आघाडीवर होते, ही त्यांच्याविषयीची माहिती त्यांची ख्याती सांगते. नोबेल विजेत्या फाइनमन यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कामाची धावती ओळख या छोटय़ाशा चरित्रातून सुधा रिसबूड यांनी करून दिली आहे. शास्त्रज्ञ म्हणजे एकलकोंडे, आपल्याच कोशात जगणारे या गृहीतकाला फाइनमन सणसणीत अपवाद म्हणावा असा आहे. चित्रकला, संगीत, इतिहास, भाषा या गोष्टींमध्ये फाइनमन यांना खूप रस होता आणि गतीही. त्यांचा स्वभाव मिश्कील. त्यामुळे मानवी जीवनाकडे ते कुतूहलाने पाहात असायचे. ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन’ हे त्यांचं आत्मचरित्रवजा पुस्तक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खुमासदार ओळख करून देतं. तसंच हे छोटंसं पुस्तक त्यांचं चरित्रही संशोधन आणि व्यक्तिमत्त्व याविषयी सारांशाने सांगतं.
‘रिचर्ड फाइनमन : एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व’ – सुधा रिसबूड,
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
पृष्ठे – १२६, किंमत – १४० रुपये.

गोष्ट मराठा लाइट इन्फंट्रीची
ब्रिटिश भारतात त्यांच्या सैन्यात मराठा लाइट इन्फंट्री ही बटालियन होती. लाइट इन्फंट्री म्हणजे निवडलेल्या मोजक्या सैनिकांची पलटण. या पलटणीतले सैनिक चपळपणे हालचाली करू शकत किंवा संधीचा अचूक फायदा उठवून शत्रूला नामोहरम करत. मराठा लाइट इन्फंट्रीने केवळ भारतातल्या विविध युद्धांतच नाही तर अबेसिनिया, इथिओपिया, पर्शिया, दुसरे महायुद्ध अशा अनेक छोटय़ामोठय़ा युद्धांत शौर्य गाजवले. स्वातंत्र्यानंतरही अनेक प्राण पणाला लावून शौर्य गाजवले. त्याची माहिती या पुस्तकात दिली आहे. लाइट इन्फंट्रीने गाजवलेली युद्धे, त्यातील जवानांना मिळालेली पदके, विविध नकाशे, छायाचित्रे यांची जोड दिल्याने पुस्तकाची उपयुक्तचा वाढली आहे.
‘मराठी लाइट इन्फंट्री : मराठय़ांची शौर्यगाथा’ – जयंत कुलकर्णी, अक्षर दालन, कोल्हापूर,
पृष्ठे – २११, किंमत – २०० रुपये.

गांधींबद्दल तरुणांचे निबंध
ही आहे म. गांधींबद्दलच्या निबंधाची वही. यात एकंदर १२ निबंध आहेत. त्यातील नऊ निबंध हे ‘आजच्या जीवनात गाधी विचारांची गरज’ या विषयावरील आहेत, तर तीन निबंध हे ‘भारत विरुद्ध इंडिया’ या विषयावरील आहेत. विशेष म्हणजे हे सर्व निबंध मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांचे आहेत. आजच्या जीवनात गांधी विचारांची नेमकी काय गरज आहे किंवा कशी याविषयी आजच्या तरुणाईने केलेले मुक्तचिंतन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. लेखक तरुण आणि त्यांची अभिव्यक्तीही ‘तरुण’, त्यामुळे या निबंधांमध्ये गांधीविचारांची पुनर्आेळखच करून दिलेली आहे. पण त्यात या तरुणांची स्वत:ची भाषा आहे. कळकळ आणि तळमळ आहे. अभ्यास, अनुभव, चिंतन या प्रगल्भ विचारांच्या चढत्या पायऱ्या असतात. हे तरुण पहिल्या पायरीपर्यंत पोहचण्याच्या तयारीत असलेले आहेत. त्यामुळे या पुस्तकातून त्यांचा भविष्यातील कल कुठल्या दिशेने राहील याची चुणूक पाहायला मिळते.
‘निबंधाची वही’ – संपा. दासू वैद्य,
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद,
पृष्ठे – १०४, किंमत – १०० रुपये.

साभार पोच
० ‘विरामचिन्हे’ – प्रवीण दवणे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १६०, मूल्य – १६० रुपये.
० ‘नवी जाणीव’ – डॉ. शशिकान्त लोखंडे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – १०४,
मूल्य – २५० रुपये.
० ‘विज्ञानपुराण’ – डॉ. शंभुनाथ कहाळेकर, मुक्तरंग प्रकाशन, लातूर, पृष्ठे – ११२,
मूल्य – १३५ रुपये.
० ‘कथा ऑलिम्पिकच्या’ – संजय दुधाणे, दिलीपराज प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १०४,
मूल्य – ७० रुपये.
० ‘माझा गणेश’ – डॉ. सुधीर निरगुडकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १५६,
मूल्य – १८० रुपये.
० ‘‘मी’ आहे तिथे’- लता गुठे, भरारी क्रिएशन, मुंबई, पृष्ठे – ६२, मूल्य – ७५ रुपये.
० ‘बिइंग ह्य़ूमन’ – डॉ. गंगाधर गळगे, स्वयंप्रकाशित, पृष्ठे – १३१, मूल्य – १७० रुपये.
० ‘भरळ’ – गुणवंत पाटील, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १४३, मूल्य – १२० रुपये.
० ‘माझे विश्व’ – आर्या गावडे, तनिष प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १११, मूल्य – ४० रुपये.
० ‘तरंग मनीचे’ – सुरेश जाखडी, विजया प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – ६०, मूल्य – ५० रुपये.
० ‘दोन टाके आभाळाला’ – शुभा प्रधान, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १६०,
मूल्य – १६० रुपये.
० ‘शून्योपचार अर्थात डॉक्टरी उपाय नकोच’ – श. प. पटवर्धन, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – १७१, मूल्य – १७० रुपये.
० ‘चावा’ – चिरंजीव, स्वयंप्रकाशित, पृष्ठे – २७५, मूल्य – दिलेले नाही.
० ‘गीतांजली’ – रवींद्रनाथ टागोर, भावानुवाद- अमिता गोसावी, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
पृष्ठे – १०८, मूल्य – १०० रुपये.