कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी पावसाचे प्रमाण मात्र कायम आहे. धरणभागात झालेल्या जोरदार पावसामुळे कोदे लघुपाटबंधारे आणि घटप्रभा धरणांची पातळी शंभर टक्के पूर्ण झाली असून २२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्यात ६३.८३ इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासात सरासरी ३६ मि. मी. इतका पाऊस झाला.
आठवडाभर पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पावसाचे प्रमाण कायम राहिल्याने धरण व नदीतील पाणीसाठा वाढत चालला आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीचे पाणी लहान पुलाजवळून वाहत आहे. सध्या ६० फुटावरून पाणी वाहत असून इशारा पातळी ६८ इतकी आहे. तर नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पाणी पातळी वाढल्याने तेथील  बहुतांश मंदिर पाण्याखाली गेले असून तेथे केवळ शिखराचे दर्शन होत आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजता झालेल्या नोंदीनुसार धरणांच्या पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.राधानगरी १३४.६९ (२३६.७९), तुळशी ३९.४१ (९८.२९), वारणा ५०२.४० (९७४.१८), दूधगंगा २४२.२९ (७१९.१२), कासारी ४३.५६ (७८.५६), कडवी ४५.६४ (७१.२४), कुंभी ४१.८४ (७६.८८), पाटगाव ५१.७२ (१०५.२४), चिकोत्रा ९.३४ (४३.११), चित्री १५.५८ (५३.४१), जंगमहट्टी १४.८७ (३४.६५), घटप्रभा पूर्ण भरले (४३.६५), जांबरे ८.५० ( २३.२३ ), कोदे ल. पा. पूर्ण भरले. (६.०६).
आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ३२ फूट २ इंच , सुर्वे ३१ फूट ६ इंच, रुई ६० फूट ६ इंच, इचलकरंजी ६० फू ट , तेरवाड ५१ फूट ९ इंच, शिरोळ ३७ फूट , नृसिंहवाडी ३० फूट ६ इंच आहे. जिल्ह्यातील २२ धरणे पाण्याखाली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या जून २०१४ पासूनच्या पावसाने कोदे लघुपाटबंधारे आणि घटप्रभा धरणांची पातळी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. कोदे लघ ६पाटबंधारे आणि घटप्रभा प्रकल्पांच्या धरणांची पूर्ण संचय पातळी अनुक्रमे १२२ मीटर, ७४२ मीटर असून दोनही धरणे पूर्ण भरलेली आहेत.