संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात पोलिसांनी वेगाने चौकशीची सूत्रे हलवताना संबंधित परीक्षार्थ्यांनंतर तीन कंत्राटी अधिकाऱ्यांनाही अटक केली असली, तरी घोटाळ्यातील सूत्रधारांपर्यंत अजूनही पोलिसांना पोहोचता आलेले नाही. या प्रकरणात आता विद्यापीठातील बडे अधिकारीही अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांना मंगळवारी चौकशीसाठी पाचारण केले होते, पण कार्यव्यस्ततेचे कारण सांगून चौकशीला सामोरे जाण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुलसचिव दिनेशकुमार जोशी, विधी अधिकारी एम.एम. जायले व उपकुलसचिव विक्रांत मालवीय यांना पाठवले. पोलिसांनी त्यांचे बयाण घेतले, पण तपासासाठी आवश्यक माहिती हाती लागली नाही, असे सांगण्यात येते.
पोलिसांना परीक्षा विभागातील सीसीटिव्ही चित्रिकरण हवे आहे, पण जानेवारीपूर्वीचे चित्रिकरणच गायब असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून मूल्यांकनाची प्रक्रिया जाणून घेतली. परीक्षा विभागात कडेकोट बंदोबस्त असतानाही विद्यार्थ्यांच्या हाती उत्तरपत्रिका सोपवण्यापर्यंत मोठे भगदाड कसे पडले, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या सक्रीय सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचे पोलिसांचे मत आहे.
कुलसचिव हे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांना परीक्षा प्रणालीविषयी फारशी माहिती नाही. संपूर्ण माहिती कुलगुरूंकडून मिळू शकेल, या हेतूने कुलगुरूंना चौकशीसाठी पुन्हा बोलावण्याच्या हालचाली पोलीस यंत्रणेने सुरू केल्या आहेत. परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत वडते हे सध्या रजेवर असून, ते सेवेत परतल्यानंतर त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गुणवाढ प्रकरणात सोमवारी अटक करण्यात आलेल्या तीन कंत्राटी अधिकाऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मास्किंग विभागातील संजय देशमुख, शिवशंकर बावस्कर आणि शेखर फुटळे या कंत्राटी सहायक मूल्यांकन अधिकाऱ्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीतून तपासाला गती देणारी माहिती लागू शकेल, असा विश्वास पोलिसांना आहे. या प्रकरणात मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.