एरवी वाहतुकीचे नियम मोडले म्हणून सर्वसामान्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवणाऱ्या आरटीओला महावितरण कंपनीने आज कारवाईचा चांगलाच दणका दिला. वीज बिल थकवल्याप्रकरणी आज वसुलीसाठी आलेल्या महावितरण कंपनीने धुळे आर.टी.ओ. कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. उपविभागीय शहर कार्यकारी अभियंता यांच्यासह महावितरण कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या वर्षभराचे आरटीओकडे ४ लाख ७७ हजार ९३३ रुपयांचे वीज बिल थकीत आहे. या बिलाच्या वसुलीसाठी आरटीओला यापूर्वीही नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला आरटीओच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आल्याने ही कारवाई महावितरणच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडे तसेच पाणी पुरवठा योजनांचेही शेकडो कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असून याची वसुली करण्यासाठी आता थेट वीज जोडणी तोडण्याचे काम महावितरण कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जळगांव परिमंडळातील धुळे, नंदुरबार, जळगांव या जिल्ह्यामध्ये ही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.