कोकणात मान्सूनचे आगमन होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार असली तरी रत्नागिरी शहर आणि परिसराला सोमवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडायला लागला असून वातावरणामध्ये लक्षणीय बदल जाणवत आहे. रत्नागिरी शहर व परिसरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप होती. दुपारी बारा वाजल्यानंतर त्याचा जोर आणखी वाढला. मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट वाहू लागले.

त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळे होत होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून आज सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस (६१ मिमी) याच तालुक्यात पडला आहे. तसेच गेल्या १ जूनपासूनची पावसाची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस  (२२८.७ मिमी) पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मात्र अशा प्रकारे जोरदार पाऊस अजून सुरू झालेला नाही. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर इत्यादी तालुक्यांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र गेल्या दहा-बारा दिवसांत जिल्ह्याच्या सर्व, नऊही तालुक्यांमध्ये पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. गेल्या १ जूनपासूनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी १३८.३५ मिलीमीटर पाऊस पडला असून संगमेश्वर (१७५मिमी), रत्नागिरी (१६७.७ मिमी), लांजा (१४८ मिमी), राजापूर (१४५ मिमी) आणि खेड (१३८ मिमी) या पाच तालुक्यांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे चिपळूण (९९ मिमी) आणि दापोली तालुक्यातही (८४.९ मिमी) बऱ्यापैकी प्रमाण राहिले आहे. मंडणगड तालुक्यात मात्र गेल्या १ जूनपासून आजअखेर सर्वात कमी (५२ मिमी) पाऊस पडला आहे.

कोकणात अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर (२५ मे) पेरण्या केल्या जातात. त्यानुसार यंदाही पेरण्या सुरू झाल्या असून सुमारे ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यामुळे बियाणे रुजण्यास मदत झाली आहे. तसेच त्याची चांगली उगवणही झाली आहे. अधूनमधून विश्रांती घेत असलेला पाऊस शेतीच्या पुढील कामांसाठी उपयुक्त ठरत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात मान्सूनचे आगमन होण्यास आणखी सुमारे दोन-तीन दिवस लागणार आहेत. मात्र त्याहीपेक्षा विलंब झाल्यास शेतीच्या दृष्टीने काहीशी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कोकणात शेतीच्या कामांची लगबग

मान्सूनच्या पावसाचे कोकणात अजून आगमन झाले नसले तरी गेल्या २ जूनपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी जोरदार हजेरी लावत असल्यामुळे सर्वत्र भातशेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. रत्नागिरीतील पाच तालुक्यांमध्ये १०० मिमी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

गेल्या दहा-बारा दिवसात जिल्ह्याच्या सर्व, नऊही तालुक्यांमध्ये पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. गेल्या १ जूनपासूनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी १३८.३५ मिलीमीटर पाऊस पडला असून संगमेश्वर (१७५मिमी), रत्नागिरी (१६७.७ मिमी), लांजा (१४८ मिमी), राजापूर (१४५ मिमी) आणि खेड (१३८ मिमी) या पाच तालुक्यांमध्ये शंभर मिमीलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्येही हे प्रमाण किमान ५० मिलीम्ीटरपेक्षा जास्त आहे. भातशेतीच्या दृष्टीने हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरला आहे.

कोकणात अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर (२५ मे)  पेरण्या केल्या जातात. त्यानुसार यंदाही आजअखेपर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर थोडय़ाच दिवसात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यामुळे बियाणे रुजण्यास मदत झाली आहे. अनेक ठिकाणी त्याची चांगली उगवणही झाली आहे. अधूनमधून विश्रांती घेत असलेला पाऊस शेतीच्या पुढील कामांसाठी उपयुक्त ठरत आहे. या टप्प्यावर पाऊस पूर्ण गायब होऊन कडकडीत ऊन पडायला लागले तरच या शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. पण सध्याच्या वातावरणारून तशी शक्यता दिसत नाही.