रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी भोजनाच्या खर्चाकरिता स्वत:च्या अंगावरील सौभाग्यालंकार विकून त्याग केला. लक्ष्मीबाईंचा विद्यार्थ्यांसाठी केलेला त्याग अजरामर आहे. त्यांच्या या त्यागाचे प्रसंग शालेय पाठय़पुस्तकांतून प्रकाशित व्हावेत, अशी सूचना समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त मनीषा फुले यांनी केली.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण संकुलात रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ८४व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. उद्योजक अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर, प्राचार्य दिलीप पाटील, मुख्याध्यापिका प्रेमलता चांगले, सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. प्रशांत नलावडे आदी उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
मनीषा फुले म्हणाल्या, लक्ष्मीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणी तथा वाटचालीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना तेवढीच महत्त्वाची साथ दिली. स्वत:जवळील माहेरातून आणलेले ९० तोळे सोन्याचे दागिने रयत शिक्षण संस्थेच्या कार्यासाठी देऊन त्या कर्मवीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वत:च्या मातोश्री आजारी असतानादेखील वसतिगृहातील आजारी विद्यार्थ्यांची शुश्रूषा त्यांनी महत्त्वाची मानली. जातधर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ असते, हे त्यांनी कार्याद्वारे दाखवून दिले. त्यांचा आदर्श घेऊन मुलींनी शिक्षण घेऊन नवीन पिढी घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी अण्णासाहेब पाटील यांचेही भाषण झाले. प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपप्राचार्य उत्तमराव हुंडेकर, अ‍ॅड. जयकुमार कस्तुरे, रमेश शहा, शशिकांत पाटील, अ‍ॅड. ऋतुजा शहा, प्रा. राजेंद्रसिंह लोखंडे, भैरव माळी, प्रा. महादेव बागल, प्रा. मधुकर श्रीवास्तव, डॉ. देवीदास गायकवाड, भालचंद्र धुमाळ आदी उपस्थित होते.