तब्बल पंधरा हजार चौरस फुटांचे सभागृह, श्रीमंती सजावट, जेवणावळी, गाडय़ांचा ताफा, मुख्यमंत्र्यांसह सगळय़ा मंत्रिमंडळाची हजेरी असा शाही थाटमाट आहे कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या शाही विवाहाचा.
थाटामाटाच्या लग्नामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे सांगितले जात असताना शेतकऱ्यांचे लढाऊ नेते म्हणून ओळखले जाणारे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या लग्नाचा थाट शुक्रवारी इस्लामपुरात पाहण्यास मिळाला. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकत्रे उपस्थित होते. खोत यांचा मुलगा सागर याच्या विवाहासाठी इस्लामपुरातील या विवाहस्थळी गेल्या काही दिवसांपासून जोरात तयारी सुरू होती. मोठी प्रकाशयोजना, पक्वान्नांच्या जेवणावळी, स्वागतासाठी पोलिसांचा वाद्यवृंद ही या लग्नातील शाही वैशिष्टय़े होती. या लग्नासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांसह १० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. मुख्यमंत्र्यांपासून जवळपास सर्व मंत्री, विरोधी पक्षातील नेते मंडळी, सहकार सम्राटांची या सोहळय़ास हजेरी होती. या भव्य दिव्य सोहळय़ासाठी सर्वत्र मोठा पोलीस बंदबस्त ठेवण्यात आलेला होता. प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यासाठी राज्यमंत्री खोत यांच्यासह खा.राजू शेट्टी प्रवेशद्वारावर ठाण मांडून होते.