जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीनंतर आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील मतदान केंद्र क्र. २१३ येथे फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. २४) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत फेरमतदान होणार असल्याची माहिती नवलकिशोर राम यांनी दिली.
बीड लोकसभा मतदारसंघात आंधळेवाडी येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १५ कार्यकर्त्यांनी केंद्रात घुसून मतदान यंत्र ताब्यात घेऊन मतदान केले. या बाबत तक्रार झाल्यानंतर तपासणीत झालेल्या मतदानापकी ८ मते जास्तीची आढळून आली. या प्रकरणी भाजपसमर्थक १०जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही झाली. त्यामुळे या केंद्रावर फेरमतदान घेण्याची शिफारस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने २४ एप्रिलला आंधळेवाडीत फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने फेरमतदानाची तयारी केली असून जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डीही गावात उपस्थित राहणार आहेत.