दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघत असताना करवीरनगरीतील काँग्रेस पक्षातील तिमिरछाया अधिकच गडद झाली आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील एकूण एक गडावरील तिरंगा उतरला गेला असल्याने पक्षाची अंधारयात्रा सुरू झाली आहे. शिवसेना आणि मोदीलाटेत हा बालेकिल्ला नामशेष झाला.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी प्रचाराचा नारळ कोल्हापुरात वाढवून हे महत्त्व अधोरेखित केले होते. काँग्रेस पक्षाने तुळजापुरात प्रचाराचा श्रीगणेशा केला असला तरी जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू, अशा वल्गना स्थानिक नेतृत्वाने निवडणुका दरम्यानच्या काळात केल्या होत्या. खरेतर, राधानगरीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच पक्षाचे माजी आमदार बजरंग देसाई यांनी पांढरे निशाण दाखवून आपला इरादा दाखवून दिला होता. परिणामी, पक्षाला दहापकी नऊ जागांवर निवडणूक लढविण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. प्रथमाग्रासे मक्षिकापात झालेल्या काँग्रेसला पुढे फारसे दिवे लावता आले नाहीत हे निकालानेच दाखवून दिले आहे.
वास्तविक, काँग्रेस पक्षाकडील उमेदवारांची मांदियाळी सशक्त होती. वातावरण प्रतिकूल असले तरी दोन-चार जण बाजी मारतील अशी शक्यताही दिसत होती. पण निकालाने मात्र काँग्रेसचे पूर्णत: पानिपत झाल्याचेच दिसून आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांना अवघ्या ८०० मतांनी पराभूत व्हावे लागले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थकांनी तर दहा हजारांपेक्षा कमी मताधिक्य घेणार नाही, अशा पजाच लावल्या होत्या. पण झाले उलटेच. पाटील यांनाच साडेआठ हजार मतांच्या फरकांनी पराभवाला तोंड द्यावे लागले. खेरीज, ९४ वर्षांचे आमदार सा. रे. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे या मातब्बरांसह उर्वरित चौघांना मात खावी लागली. काँग्रेसचे खातेही न उघडण्याचा इतिहासातील हा पहिलाच प्रसंग. काँग्रेसची धूळधाण उडाली असल्याने पक्षाचे अस्तित्व आगामी काळात कसे राहणार याची चिंता पराभूत उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही लागून राहिली आहे. विधानपरिषदेचे सदस्य महादेवराव महाडिक यांच्या रूपाने एकच मिणमिणता दिवा अंधारयात्रेत तेवत राहिला आहे. महाडिकांचे पुत्र भाजपचे आमदार अन् पुतणे राष्ट्रवादीचे खासदार अशी अवस्था असल्याने त्यांच्याकडून काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे नेमके किती प्रयत्न होणार याविषयी शंका आहेच.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील व उत्तरचे उमेदवार मालोजीराजे यांच्या पराभवास हातभार लावल्याची चर्चा होती. यामुळे दुखावलेल्या त्यांच्या समर्थकांनी पाटील यांचा काटा काढल्याचे उघडपणे बोलले जात आहे. यामुळे आता पी.एन.-सतेज यांच्यात कितपत समन्वय राहणार, आवळे-आवाडे यांच्यातील वैमनस्य संपुष्टात येणार काय, यावर पक्षबांधणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मुख्य म्हणजे गोकुळवरील वर्चस्वावर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्षांची नांदी होण्याची चिन्हे आहेत. गोकुळमध्ये सध्या महाडिक, पी. एन. पाटील एकत्र असले तरी महाडिक यांच्या वर्चस्वाला सतेज पाटील यांच्याकडून आव्हान दिले जाणार का अन् तसे झाल्यास त्यातून उद्भवणाऱ्या वादातून पक्ष ऐक्याची दिशा कशी बदलत जाणार यावरही काँग्रेसच्या राजकारणाची अनेक गृहीतके अवलंबून असणार आहेत.