राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या महापौरपदाच्या बदलाच्या हालचालींच्या पार्श्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी हेही सतर्क झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांच्यासाठी या गटाची चाचपणी सुरू झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपद सोडावे, अशा हालचाली राष्ट्रवादीत सुरू झाल्या आहेत. पक्षश्रेष्ठींच्या या आदेशाला जगताप यांनीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळेच शहरात महपौरपदाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून, राष्ट्रवादीत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर त्यासाठी इच्छुक आहेत. महानगरपालिकेत दोन्ही काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काही अपक्ष अशी सत्ता आहे. महापौर बदलायचा तर ही मोट पुन्हा बांधणे ही कसरतच ठरण्याची चिन्हे आहेत.
अशातच आता भाजपचा गांधी गटही महापौरपदासाठी सक्रिय झाल्याचे समजते. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी त्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी काही अपक्षांशी संपर्क साधल्याचेही समजते. मनपात भाजप-शिवसेना युती असली तरी दोन्ही पक्षांमधील विशेषत: गांधी-राठोड अशी व्यक्तिगत पातळीवरच मोठी दुही निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपलाही ही मोर्चेबांधणी करताना कसरतच करावी लागेल, असे दिसते.