राज्यातील युवकांच्या विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी अनुदान तात्काळ मंजूर झाल्याने संबंधित संस्थांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य युवा धोरण-२०१२ नुसार युवकांना व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना युवक कल्याणविषयक उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी राज्य युवा विकास निधीची स्थापना राज्य शासनाने केली आहे. त्या अंतर्गत युवक कल्याण उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी अपेक्षा आहे. २०१५-१६ अंतर्गत साडे चोवीस लाख रुपये देण्यात आले होते. आता २०१६-१७ साठी ३५ लाख रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यापैकी ८० टक्के म्हणजे २८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. क्रीडा व युवक सेवा आयुक्तांची या निधीबाबत आवश्यक त्याच कार्यक्रमांवर हा निधी खर्च करण्याची सूचना केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी या अनुदानाबाबत निर्णय घेणार आहेत. या अनुदानातून युवकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम घेणे अपेक्षित असले तरी त्यातून   काय साध्य झाले, याविषयी निश्चित आकलन होत नसल्याचे राज्यभरातील चित्र आहे. अनुदान घेणारी संस्था आरोग्य शिबिरे, रोजगारविषयक कार्यक्रम, वृक्षारोपण स्वरूपात कार्यक्रम आटोपतात. ही बाब काही युवकांना लाभ देणारी ठरते. मात्र, हे अनुदान छोटय़ा संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया मराठी वैभव युवक संस्थेचे अध्यक्ष अरुण वानखेडे यांनी दिली. अनुदानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलीना सौंदर्यशास्त्राचे प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.  या अनुदान वाटपात यंदापासून बदल करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर म्हणाले. अनुदानाचा योग्य उपयोग करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सामूहिक उपक्रम राबविण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. या जिल्ह्य़ात शंभरावर युवक कल्याण संस्था कार्यरत आहेत. व्यक्तिगत अनुदान देण्याऐवजी २० संस्थांचा गट तयार करण्याचे प्रस्ताव आहे. प्रत्येक संस्थेने दहा मुलांची निवड केल्यानंतर दोनशे मुलांच्या गटास स्वयंरोजगाराच्या कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना या कार्यशाळेत निमंत्रित करून रोजगाराच्या नव्या संधींबाबत युवकांना अवगत करण्याचा प्रयत्न होणार आहे.